राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा विस्तारित केली. दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या गरीब व गरजू रुग्णांना आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्र्यांचे काम पाहून या निधीला हातभार लावण्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सामान्य कार्यकर्त्यांनी योगदान दिले असून तब्बल आठ लाख २१ हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. नागपूर येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते या निधीचा डिमांड ड्राफ्ट प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार संतोषभाऊ बांगर उपस्थित होते.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात स्वतंत्रपणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस स्वतः कार्यालय उपलब्ध करून दिले असून तिथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. राज्यभरातून दररोज येणाऱ्या मागणी अर्जानुसार दुर्धर व्याधींनीग्रस्त असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सढळ हाताने मदत केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार महेश शिंदे यांनी आपला ऑगस्ट महिन्यातील वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन कोणताही जाहीर कार्यक्रम अथवा उत्सव न घेता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार मतदारसंघातील कोरेगाव सर्वच गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने योगदान दिले होते. संपूर्ण मतदारसंघातील रक्कम ही आठ लाख २१ हजार रुपये जमा झाली.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर, तालुका उपप्रमुख चंद्रकांत पवार, संदीप केंजळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी निलेश नलावडे, युवा सेना तालुका प्रमुख धनवान कदम, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य अमोल माने, तानाजी गोळे, सुधीर बुधावले, विनेश साळुंखे, प्रवीण कदम, महेश साबळे, सोमनाथ शेडगे, रवी माने, उद्धव जाधव, रवी माने, संतोष साबळे, रुपेश भोसले, प्रशांत कदम, बाबा नलगे यांच्यासह मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयडीबीआय बँक कोरेगाव शाखेवरील डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा सामान्यतील असामान्य कार्यकर्ता म्हणजे आमदार महेश शिंदे आहे, असे गौरवाने सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आमदार महेश शिंदे हे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतात, हे मी आजवर ऐकून आणि जाणून होतो. पण आज प्रत्यक्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे यांचा आदर्श घेऊन दिलेले योगदान अविस्मरणीय आहे, असे गौरवोदगार देखील मुख्यमंत्र्यांनी काढले.
आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भविष्यकाळात देखील जास्तीत जास्त मदत करण्याचा शब्द यावेळी दिला.
४८ वा वाढदिवस आणि ४८ हजार रुपयांचे योगदान; प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचे दातृत्व
आमदार महेश शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव मतदारसंघात कार्यकर्त्यांची एक चांगली फळी निर्माण झाली आहे. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या ४८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ४८ हजार रुपयांचे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले. समाजातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून होणारी मदत लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार महेश शिंदे यांना अभिप्रेत असलेले आरोग्य संवर्धनाचे काम यापुढेही सुरू राहणार असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले.