VIDHANSABHA ELECTION:कोरेगाव शहरात रॅलीद्वारे प्रचार शुभारंभ ; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
VIDHANSABHA ELECTION: कोरेगावकरांचा मानसन्मान ठेवून त्यांच्या समोर नतमस्तक होताना शहराला विकासात नेहमीच झुकते माप दिले. कधीही जाहिरात बाजी केली नाही. परंतु येथील आमदारांनी आरक्षण टाकून कोरेगावकरांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेशी गद्दारी करून कोरेगावचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे.असा घणाघात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान गरिबीचा फायदा घेऊन सर्व सामान्य लोकांना दमबाजी करण्यापेक्षा माझ्याशी वन टू वन भिडा असे आव्हान आ. शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना दिले.
आ. शशिकांत शिंदे यांच्या निवडणूक प्रचारार्थ कोरेगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ,माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील सभागृहात झालेल्या प्रचार सभेत आ. शशिकांत शिंदे बोलत होते.
या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शहाजीराव बर्गे, ऍड. जयवंतराव केंजळे, दिनेश बर्गे, मनोहर बर्गे, संजय पिसाळ, अमरसिंह बर्गे, ऍड.श्रीकांत केंजळे, डॉ. दिलीप घोडके, माजी उपसरपंच हणमंत पवार, नगरसेवक हेमंत बर्गे, प्रितम बर्गे, किशोर नानासाहेब बर्गे, किशोर रामचंद्र बर्गे, गणेश धनावडे, मनोज येवले, प्रतिभा बर्गे, मोनिका धनवडे, प्रभावती बर्गे व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, विकासकामांच्या नावाखाली येथील आमदारांनी स्वतःची कंत्राटदारी केली. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले. स्वतः आरक्षण टाकून माझ्याकडे या आरक्षण उठवितो असे सांगून दडपशाही चालू केली. आज ते प्रत्येकाला ऑफर देत आहेत, परंतु आमच्या सोबत निष्ठावंत लोक आहेत. विकासाच्या नावाखाली काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी गेले. त्यांचा काय स्वार्थ आहे हे जनतेला माहीत आहे. असे सांगून ते म्हणाले, मी कधीही येथील बर्गें विरोधात निर्णय घेतला आहे. तर पहिला नगराध्यक्षाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसने बर्गें यांनाच दिला. टंचाईच्या काळात येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न केला तर आमदारांनी जनतेचे पाण्यावाचून हाल केले. कोरोना काळात रूग्णांना मोफत वैद्यकीय उपचार व रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून दिले.एक पैसाही आम्ही रूग्णांकडून घेतला नाही. की त्याची जाहीरात बाजी केली नाही. पण येथील लोकप्रतिनिधी कोरोनाचे राजकारण करून लोकांना दमबाजी करीत आहेत. आमदारांच्या सत्तेच्या गुर्मित येथील सर्वसामान्य माणूस भरडला जात असून मनुवादी व जातीयवादी संस्कृती या मतदारसंघात आणत आहेत. मतदारसंघांतील मतदारांची नावे कमी करून संविधानाने दिलेल्या अधिकारावर त्यांनी गदा आणली आहे. असे सांगून आ शशिकांत शिंदे म्हणाले, मतदारसंघात पुण्याचे गुंड आणून माझ्या कार्यकर्त्यांना दमबाजी करीत असताना मी शांत बसणार नाही हिंमत असेल तर त्यांनी मला वन बाय वन भिडावे असे आव्हान देऊन आ. शिंदे यांनी पैसा, सत्ता या माध्यमातून कोरेगाव करांना आव्हान देणारे आमदार भुमिपुत्रांनाच त्रास देत आहेत. पक्ष व नेत्यांशी गद्दारी करून त्यांनी कोरेगावच्या स्वाभिमानाला धक्का दिला असल्याने मतदार हे सहन करणार नाहीत. जनतेने ठरविले तर रावाचा रंक झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून त्यांनी या मतदारसंघात जनतेने आमदारांच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात उठाव केला असून कोरेगावची स्वाभिमानी जनता हिटलरशाही आमदारांना या निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी सज्ज झाली आहे.
यावेळी डॉ. गणेश होळ, संजय पिसाळ, दिनेश बर्गे, ऍड. श्रीकांत केंजळे, , ऍड. जयवंतराव केंजळे, मनोहर बर्गे यांनी मनोगत व्यक्त करून येथील कोरेगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या कारभाराचा पंचनामा केला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोरेगाव शहर विकासनामा पत्रक प्रसिद्ध करण्यात आले.
या सभेला कोरेगाव शहरातील नागरिक, महिला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. VIDHANSABHA ELECTION