Headlines

कोरेगावच्या नवीन एस. टी. बसस्थानकाचे रुपडे अखेर पालटणार

कोरेगावच्या नवीन एस. टी. बसस्थानकाचे रुपडे अखेर पालटणार

कॉंक्रीटीकरणासाठी तब्बल २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर

आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून एस. टी. महामंडळ आणि एम. आय. डी. सी. चा संयुक्त प्रकल्प

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगावच्या नवीन एस. टी. बसस्थानकाचे रुपडे अखेर पालटणार आहे. गेली अनेक वर्षे खड्डेमय असलेले वाहनतळ आता चकाचक होणार असून, आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कॉंक्रीटीकरणासाठी तब्बल २ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एस. टी. महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संयुक्तरित्या हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. नागपूर येथे त्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला.
१९५२ साली कोरेगावच्या नवीन एस. टी. बसस्थानकाची पूर्वीच्या नॅरोगेज रेल्वे स्थानकासमोर उभारणी झाली होती. तेव्हापासून इमारत आणि परिसराचे नुतनीकरण झालेले नव्हते. किरकोळ डागडुजी केली जात होती, मात्र नव्याने सुलभ शौचालय आणि कर्मचारी विश्रांतीगृह उभारण्यापलिकडे नवीन कोणतीही गोष्ट या परिसरात करण्यात आलेली नव्हती. बसस्थानक परिसरातील खड्डे, पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल आणि चिखलातून वाट काढत एस. टी. बसपर्यंत पोहचण्यासाठी प्रवाशांना मोठे दिव्य करावे लागत होते.
आमदार महेश शिंदे यांनी यासंदर्भात एस. टी. महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून आढावा घेतला होता, त्याचबरोबर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना बसस्थानक व आगार परिसरासाठी आवश्यक विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करुन घेण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते असल्याने त्यांच्यासमवेत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान चर्चा देखील झाली होती.
नागपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यादरम्यान सामंजस्य करार मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानुसार ६०० कोटी रुपयांचा निधी औद्योगिक विकास महामंडळ उपलब्ध करुन देणार असून, त्याद्वारे राज्यभरातील १९३ एस. टी. बसस्थानकांचे सुशोभिकरण, सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये कोरेगावच्या नवीन एस. टी. बसस्थानकाचा समावेश आहे. एस. टी. बसस्थानकासमोर असलेला कोरेगाव-तडवळे संमत कोरेगाव हा रस्ता देखील कॉंक्रीटीकरण केला जाणार असून, त्याचे काम लवकरच सुरु आहे. एकूणच आमदार महेश शिंदे यांनी विशेष लक्ष दिल्याने कोरेगावच्या नवीन बसस्थानकाचे रुपडे आता पालटणार आहे.

प्रवासी हितासाठी अत्यंत बारकाईने लक्ष
आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या हितासाठी महामंडळाच्या कारभारावर अत्यंत बारकाईने लक्ष दिले आहे. स्वत: त्यांनी अधिकार्‍यांनी वेळोवेळी आढावा घेतलाच आहे, त्याचबरोबर डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांनी दोनदा कोरेगाव आगारास भेटी देऊन तेथील अधिकार्‍यांकडून कामकाजाचा आढावा घेत सुधारणा करण्याविषयी सूचना दिल्या आहेत. अधिकार्‍यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकास आता मान्यता मिळाली असून, कोरेगावच्या जुन्या एस. टी. बसस्थानकाबरोबरच नवीन बसस्थानकाचा विषय मार्गी लागल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *