सातारा जिल्ह्यात महायुतीची पहिली प्रचार सभा
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आज आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महेश शिंदे यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
आमदार महेश शिंदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले असून सातारा जिल्ह्यात पहिली प्रचारसभा कोरेगाव येथील भंडारी मैदानावर पार पडली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले पश्चिम महाराष्ट्राचा हा भाग ऊस उत्पादक भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील लोकांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याचा प्रयत्न महेश शिंदे यांनी केला असल्याचे मत यासमयी व्यक्त केले. लाडक्या बहिणींनी यावेळी मोठ्या उत्साहात माझे स्वागत केले. तसेच मला राख्या बांधून माझ्यावर फुलांचा वर्षाव केला. आपणा सर्वांचा हा स्नेह आणि विश्वास हीच आमची खरी ताकद असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
महाविकास आघाडीच्या काळात काही जण याच विधानसभा मतदारसंघात येऊन उघडपणे शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा बोलून दाखवत होते, त्याची कैफियत अनेकदा मांडून आणि प्रलंबित प्रश्नांसाठी निधी मागूनही नेतृत्त्वाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नव्हती, अखेर शिवसेनेला वाचवण्यासाठी आणि मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला त्यात महेश शिंदे यांनी मला साथ दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, अन्नपूर्णा योजना, साडेसात एचपी पर्यंत वीजबिल माफ करण्याची योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना अशा विविध लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत. मात्र काही मंडळींनी या योजनांची चौकशी करून त्या बंद करण्याची घोषणा केली आहे, तसेच ती राबवणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचा पण प्रयत्न केला आहे. मात्र सर्वसामान्य लोकांसाठी १०० वेळा तुरुंगात जायला तयार असल्याचे मत यासमयी व्यक्त केले. या सभेला नागरिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता महेश शिंदे प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसेच शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी – आरपीआय महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोरेगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.