MPSC EXAM: स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील आपले ध्येय ठरवून त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील प्रा. प्रकाश जवळ यांनी प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.सुंदर पोटभरे यांनी केले.
श्री मुधाईदेवी शिक्षण संस्था संचालित प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, समान संधी केंद्र व अग्रणी महाविद्यालय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रथम सत्रात ते बोलत होते. प्रा.जवळ पुढे म्हणाले कि, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करीयरच्या अनेकविध संधी असून पोलिस, आर्मी, वायुदल, नौदल, फायर ब्रिगेड तसेच बँकिंग अशा विविध क्षेत्रातील संधी आज युवकांना खुणावत आहेत. युवकांनी फक्त त्याचा शोध घेऊन आपल्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेऊन त्या क्षेत्रात गेले पाहिजे. स्पर्धा परीक्षेतील यश संकल्पना, तंत्र आणि त्यातील डावपेच यांचा समग्र अभ्यास करून आत्मसात केले पाहिजेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील युवकांनी आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लोकसेवा आयोगात यशस्वी झालेल्या अधिकाऱ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे असे सांगितले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शक करताना पोलीस निरीक्षक श्री.शैलेश गायकवाड म्हणाले कि श्री सन १९५६ पासून मुधाईदेवी शिक्षण संस्था गुणवत्ता आणि शिस्त यासाठी देऊर परिसरात ओळखली जाते. या संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्यासाठी अहोरात्र झटणारे असून त्यांनी आमच्यासारखे अनेक अधिकारी घडविलेले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात मनाची मानसिक तयारी महत्वाची असून आपण जिद्दीने या क्षेत्रात उतरले पाहिजे. जर आपली कोणत्याही क्षेत्रात मनापासून कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्कीच यश मिळते त्यामुळे सातत्याने आपल्या मनात स्पर्धा परीक्षेच्या विचारांचा जागर जागता ठेवला पाहिजे. याबरोबर विविध विषयांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी गटचर्चा करून त्यावर सांगोपांग चर्चा घडवून आणून स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. या महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सक्रीय असून ग्रामीण भागातील तरुणांनी याचा लाभ उठविला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी चवरे म्हणाले कि महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग दाखविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असून महाविद्यालय नेहमीच अशा विद्यार्थीकेंद्रित कार्यक्रमावर भर देत आलेले आहे. स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे यासाठी अशा कार्यशाळा महत्वपूर्ण ठरतात. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून असे अनेकविध कार्यक्रम घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी याकडे सकारात्मकपणे पहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील या शैक्षणिक वर्षातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, समान संधी केंद्र व अग्रणी महाविद्यालय योजना या विभागांचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात सहा. प्रा. मनिषा पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समान संधी केंद्र समन्वयक सहा प्रा.सुर्यकांत अदाटे यांनी तर आभार प्रदर्शन महाविद्यालय अग्रणी योजना समन्वयक सहा.प्रा.पांडुरंग पाटील यांनी केले. कार्यक्रमास श्री मुधाईदेवी विद्यामंदिर व मा. कृ. माने महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.प्रदीप ढाणे, डॉ.कमलसिंग क्षत्रिय, दैनिक तरुण भारतचे पत्रकार श्री.प्रकाश कुंभार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.