Headlines

ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या तीळगंगा नदी सुशोभिकरणाचा शुभारंभ

विकासाभिमूख कोरेगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : आमदार महेश शिंदे Amdar Mahesh Shinde

भाषण करताना आमदार महेश शिंदे, शेजारी सुनील खत्री, राहुल प्रकाश बर्गे, राजाभाऊ बर्गे, साईप्रसाद बर्गे, राहुल रघुनाथ बर्गे, सूर्यकांत बर्गे, दिपाली बर्गे, सुनील बर्गे, सचिन बर्गे व मान्यवर.

प्रकाश राजे-कोरेगाव : कोरेगाव शहर हे पाश्‍चिमात्य देशांमधील सुरेख शहरांच्या धर्तीवर बनवायचे असून, नागरिकांनी त्यामध्ये स्वत:हून हातभार लावणे आवश्यक आहे. कोट्यवधी रुपयांची विकासकामे एकाबाजूला होत असताना, आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, त्याने ती मनापासून पार पाडली तर कोरेगाव शहर हे निश्‍चितपणाने नावारुपास येईल, असा विश्‍वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
कोरेगाव शहरातील बहुचर्चित ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या तीळगंगा नदी सुशोभिकरण या ४० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा शुभारंभ व प्रभाग क्र. दोन मधील विविध विकासकामांचा लोर्कापण सोहळा आमदार महेश शिंदे यांच्याहस्ते झाला. त्याप्रसंगी कोरेगावकर नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्राचार्य अनिल बोधे, सूर्यकांत बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषआबा जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काटकर, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, राहुल रघुनाथ बर्गे, नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, राजेंद्र वैराट, नगरसेविका शितल संतोष बर्गे, स्नेहल आवटे, मुन्नाभाई काझी, माजी नगरसेवक महेश बर्गे, रशीद शेख, डॉ. विघ्नेश बर्गे, ॲड. अभिजीत केंजळे, सचिनभैय्या बर्गे, विजय घोरपडे, श्रीकांत बर्गे, अजित बर्गे, अनिकेत सूर्यवंशी, संजय दुबळे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका यावेळी उपस्थित होत्या.
केंद्र व राज्य सरकारने भरभरुन निधी दिल्याने कोरेगावचा विकासात्मक कायापालट होत आहे. विधानसभा सदस्य म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर ५ ते ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणल्याचे जाहीर झाल्यावर विरोधक टिका करत असत, एवढा कोटी रुपयांचा निधी येतो का ? पण आज तेच विरोधक कोट्यवधी रुपयांच्या विकासनिधीतून होत असलेली दर्जेदार व ठोस विकासकामे पाहून चक्रावून जात आहेत, असे आ. महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोरेगाव शहराबरोबरच मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला असून, प्रत्येक विकासकाम पूर्ण झाले आहे. १३७ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे निविदा प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात असून, ती महिनाभरात सुरु केली जाणार आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ६७ कोटी रुपयांचा आणखी निधी आपल्याला मिळणार असून, कोरेगाव शहराने आता पाचशे कोटी रुपयांच्या विकासनिधीचा टप्पा ओलांडला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुनील खत्री म्हणाले की, आमदार महेश शिंदे यांच्या रुपाने संपूर्ण मतदारसंघाला विकासपुरुष लाभला आहे. प्रत्येक काम हे त्यांच्या लक्षात असते आणि ते ठरवून कामे करतात, सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी कोरेगाव शहराचा चेहरामोहरा बदलला असून, नजिकच्या काळात आरोग्य विषयक बाबींकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत.
राहूल बर्गे म्हणाले की, प्रभाग क्र. दोन मध्ये हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत आहे. आमदार महेश शिंदे यांनी प्रचंड निधी या प्रभागासाठी दिला असून, तीळगंगा नदी सुशोभिकरण प्रकल्पामुळे या परिसराचा चौफेर विकास होणार आहे. शहरात आज सर्वत्र विकासकामे सुरु आहेत, अनेकांना त्याचा त्रास होत आहे, मात्र विकास पाहिजे असेल तर थोडा त्रास सहन करावा लागेल, असे स्पष्ट करुन त्यांनी विनाकारण टीका करणार्‍या विरोधकांचा समाचार घेतला.
प्रारंभी कोरेगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नेत्रदीपक यश संपादन केलेल्या तडवळे संमत कोरेगाव, शिरढोण, मुगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे कोरेगाव शहरप्रमुखपदी महेश शामराव बर्गे यांची नियुक्ती तालुकाप्रमुख संजय काटकर यांनी केली असून, नियुक्तीपत्र आमदार महेश शिंदे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी प्राचार्य अनिल बोधे, व वैभव उर्फ बंडू बर्गे यांची भाषणे झाली. संतोष नलावडे यांनी स्वागत केले. महेश बर्गे यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक साईप्रसाद बर्गे यांनी आभार मानले.

आता नगरपंचायतच घेणार नागरिकांच्या आरोग्याची काळजी

आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहराचा विकास हा परदेशातील शहराप्रमाणे करत असल्याचे सांगितले. ज्या शहराचे रोलमॉडेल आपण घेतले आहे, तेथे नागरिकांचे आरोग्यााचे विषय नगरपंचायत हाताळते, त्याचधर्तीवर कोरेगावात देखील नगरपंचायत नागरिकांचे आरोग्य संवर्धन करणार असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत योजना तयार केली जात असून, त्याचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

तीळगंगा प्रकल्प कमीत कमी कालावधीत पूर्ण करणार

कोरेगाव शहराचे महत्व अधोरेखित करणार्‍या तीळगंगा सुशोभिकरण प्रकल्प हा तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात महादेवनगर-दत्तनगर परिसरात कामे होणार असून, दुसर्‍या टप्प्यात साखळी पूल ते बाजारपेठ पूल हे काम होणार आहे, तेथून श्री केदारेश्‍वर मंदिरापर्यंत अडीच किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प साकारत असून, तज्ञ आर्किटेक्ट यांनी डिझाईन केली आहे. हे काम कमीत कमी कालावधीत म्हणजे अवघ्या पाच महिन्यातच पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. नगरपंचायतीत सत्तेत असलेल्या या पदाधिकार्‍यांच्या आणि नगरसेवकांच्या कार्यकालात कोरेगाव शहरातील सर्वच विकासकामे पूर्ण होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांचे विस्मरण; जनता सगळे चांगले ओळखते

आमदार महेश शिंदे यांनी अत्यंत भारदस्त भाषण केले. आजच्या चांगल्या कार्यक्रमामध्ये विरोधकांवर न बोलणे योग्य असे म्हणत त्यांनी जे जनतेचे झाले नाहीत, जे विकास करत नाहीत, विकासाच्या आड येतात, त्यांचे विस्मरण झाल्याशिवाय राहत नाही. जनता हुशार असून, ती सगळे चांगल्याप्रकारे ओळखते असे स्पष्ट करुन आमदार महेश शिंदे यांनी सुनील खत्री यांच्या भाषणाचा धागा पकडत माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी उभारलेल्या जरंडेश्‍वर कारखान्यामुळेच आज शेतकरी उभा असून, तालुक्याचे अर्थकारण होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

दोन टीएमसी पाणी आणले, आता ध्येय कारखानदारी आणण्याचे

आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे स्पष्ट करत आता मतदारसंघासाठी हक्काचे दोन टीएमसी पाणी उपलब्ध करुन दिले आहे, विकासनिधीच्या रुपाने पैसा कधीही उपलब्ध होऊ शकतो, पण पाणी मिळणे मुश्किल असते, आपण हक्काचे पाणी आणले आहे. आता युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कारखानदारी उभारण्याचे आणि आाणण्याचे स्वप्न असून, नजिकच्या काळात कोरेगाव मतदारसंघाचा चौफेर विकास झालेला आपल्याला पाहिला मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दत्तनगर- महादेव नगरवासियांची एकी; कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद

कोरेगाव शहरातील महत्त्वपूर्ण प्रभाग असलेल्या दत्तनगर व महादेवनगरमधील नागरिकांनी एकत्रित येऊन विकास कामांचे लोकार्पण आणि तीळगंगा नदी सुशोभीकरणाचा शुभारंभ हे दोन्ही कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पाडले. या कार्यक्रमासाठी सर्वजण गेले तीन दिवस अहोरात्र परिश्रम घेत होते. वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते हे आपल्या घरातील कार्यक्रम असल्यासारखे वागत होते आणि संपूर्ण मतदारसंघाच्या इतिहासात नोंद होईल, असा उत्कृष्ट कार्यक्रम सर्वांचे एकीने पार पडला. या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. एकूणच दत्तनगर आता विकासकामांद्वारे बदलत असल्याचे चित्र पाहून सर्वजण सुखावले आहेत

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *