आमदार Shashikant Shinde यांचा इशारा
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या असून, याप्रश्नामध्ये जिल्हाधिकारी, कृषी विभागाने लक्ष घालावे. नाही तर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार Shashikant Shinde यांनी दिला आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे, की शासनाने सोयाबीनचा हमीभाव चार हजार ८९२ एवढा जाहीर केला आहे; परंतु प्रत्यक्षात हमीभावाप्रमाणे खरेदी होत नाही.
खरीप हंगामातील घेवडा व सोयाबीन ही मुख्य पिके आहेत. या नगदी पिकांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर घेवड्याचा हंगाम जवळजवळ संपत आला आहे. आता सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे. दसरा, दिवाळी हे सण तोंडावर आहेत. दसरा आनंदात साजरा व्हावा, दिवाळी गोड व्हावी, रब्बी हंगामातील पेरणीसाठी मदत व्हावी, यासाठी सोयाबीनला चांगला दर मिळावा या अपेक्षेमध्ये शेतकरी आहेत. त्यामुळे पावसापासून बचाव करत करत सोयाबीनची काढणी, मळणी करून शेतकरी तयार माल विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे घेऊन जात आहेत. शासनाने सोयाबीनचा हमीभाव चार हजार ८९२ एवढा जाहीर केला आहे; परंतु प्रत्यक्षात हमीभावाप्रमाणे खरेदी होत नाही. यापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांच्या पातळीवर काही उपाययोजनांची कार्यवाही केली जात आहे. असे असले तरीही शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची अडवणूक करून व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नामध्ये जिल्हाधिकारी, कृषी विभागाने लक्ष घालून सोयाबीनला हमीभावापेक्षा चांगला दर मिळवून देण्यासाठी यंत्रणा कार्यरत उभी करावी. नाही तर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. Shashikant Shinde