Headlines

शशिकांत शिंदे सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज, शरद पवार राहणार उपस्थित

यशवंत विचार जपण्यासाठी व शरद पवारांना ताकद
देण्यासाठी 15 रोजी बहुसंख्येने सातार्‍यात या : आ. शशिकांत शिंदे


सातारा : लोकसभेची आत्ताची निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर नेण्यात आली आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे आशास्थान व शेतकर्‍यांचे कैवारी असणार्‍या शरद पवार यांच्या विरोधात भाजपने मोठे षडयंत्र रचले आहे. त्यांना संपवण्यासाठी विडा उचलला गेला आहे. मात्र, पवारांचा हा निष्ठावंत पाईक या विरोधात लढण्यासाठी मैदानात उतरला आहे. माझी उमेदवारी कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही. शरद पवार यांचे विचार जपण्यासाठी व स्व. यशवंतराव चव्हाण यांचा सुसंस्कृत राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी मी तुमच्या सर्वांच्यावतीने लढत आहे. येत्या सोमवारी (दि. 15 रोजी) महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण,शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या विचारांना साथ देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा, असे आवाहन महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
मविआतर्फे आ. शिंदे सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी गांधी मैदानावरून शक्तीप्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली जाणार आहे. त्या अनुषंगाने बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, लोकसभेची ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. स्व. यशवंतरावांच्या सुसंस्कृत राजकारणाला बट्टा लावणार्‍या प्रवृत्तींविरोधात ही लढाई आहे. राजकारणाला लागलेले गलिच्छ वळण सर्वसामान्य जनतेला पटलेले नाही. जनतेच्या मनात प्रचंड असंतोष धगधगत आहे. त्यांच्यातील उद्रेकाची भावना निकालातून बाहेर पडेल. शरद पवार यांचा मी निष्ठावंत शिलेदार आहे. पवारांच्या विचारावर जीव लावणारी सातारा जिल्ह्यातील जनता आहे. शरद पवार यांना राजकारणातून संपवण्यासाठी महाशक्तीकडून अनेक क्लृप्त्या लढवल्या आहेत. त्यांनी जीवापाड जपलेला त्यांचा परिवार उद्ध्वस्त करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कधी ईडीची दहशत दाखवली जाते तर कधी चौकशीचा ससेमिरा मागे लावून एखाद्या प्रकरणात अडकवले जाते. सातारा जिल्ह्यातील पवारांवर प्रेम करणार्‍या जनतेला हे असह्य बनले आहे. त्यातूनच माझी उमेदवारी पुढे आली आहे. मी कोणाच्या विरोधात अथवा कोणाची जिरवण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आपणाला जिल्ह्याचा स्वाभिमान जपायचा आहे. येथील जनता कायम शरद पवार यांच्या सोबत राहिली आहे. त्यांच्या एकजुटीतून आपणाला स्वाभिमानी क्रांती घडवायची आहे. शरद पवार यांच्यासारखा पहाडी नेता, जनतेचे आशीर्वाद, त्यांचे प्रेम याच्या जोरावर मी नक्की यशस्वी होईन याचा मला विश्वास आहे. सोमवारी ऐतिहासिक गांधी मैदानावरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली निघणार असून तुम्हाआम्हा सर्वांचे आराध्य दैवत व महाराष्ट्राचा जानता राजा पवारसाहेब यांच्या साक्षीने ही रॅली निघेल. यामध्ये माजी मुख्यमंत्री आ.श्री पृथ्वीराज चव्हाण माजी खासदार श्रीनावास पाटील पाटील आमदार बाळासाहेब पाटील डॉक्टर भारत पाटणकर, नितीन बानगुडे पाटील, सुनील माने सारंग पाटील , विक्रमसिंह पाटणकर, उदयसिंह उंडाळकर , अविनाश मोहिते,सत्यजित पाटणकर दीपक पवार डॉक्टर नितीन सावंत डॉक्टर सुरेश जाधव कॉम्रेड वसंतराव नलावडे वर्षाताई देशपांडे अजून हर्षल कदम शिवसेना सचिन मोहितेअसलंम तडसरकर मीना सय्यद विजय मांडके, आनंदीताई अवघडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी बहुसंख्येने सहभागी व्हा, असे आवाहनही शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *