Jarandeshwar Trek दर श्रावणी शनिवारी होतेय भाविकांची गर्दी
Jarandeshwar Trek वनौषधींनी समृद्ध आहे जरंडेश्वर मारुती डोंगर
मित्रांनो श्रावण सुरु झालाय आणि पावसाळी पर्यटनाला प्रत्येकाला बाहेर पडू सुट्टी असल्यामुळे तुम्ही फिरायला तयार असालच…..शनिवार जवळ आला की चाहूल लागते ती भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असणाऱ्या बजरंगबलीची……तर चला महाराष्ट्र वन या परिपूर्ण माहितीचे व्यासपीठ असणाऱ्या न्यूजपोर्टलवरून आज Jarandeshwar Trek जरंडेश्वर भेटीला…….
श्रावण महिना आणि जरंडेश्वर वर हनुमान भक्तांची गर्दी Jarandeshwar Trek
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या सातारारोडपासून जवळ असलेले, निसर्गाच्या कुशीत उंच डोंगरावर वसलेले, भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेले व सातारा जिल्ह्यातील असंख्य भक्तगणांचे श्रध्दास्थान म्हणजेच श्री जरंडेश्वर मारूती. नवसाला पावणारा मारुती म्हणजे जरंडेश्वर अशी परिसरात ख्याती असल्यामुळे उंच डोंगरावर असूनही भक्तांच्या गर्दीमुळे हा परिसर शनिवारी आपल्याला गजबजून गेलेला पहायला मिळतो. विशेष करून श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी या ठिकाणी भक्तीला अक्षरश: महापूर आलेला असतो. या दिवशी या ठिकाणी अभिषेक, आरती, भजन, प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजित केले जाते. जरंडेश्वर हे अत्यंत पुरातन देवस्थान असून दिवसेंदिवस येथे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत आहे. स्थानिक लोक याला जरंड्याचा डोंगर असेही म्हणतात. तर संपूर्ण तालुक्याचे आकर्षण असून जरंडेश्वर मारुती श्रद्धास्थान आहे.
Jarandeshwar Trek रामायण काळापासून जरंडेश्वर ची महती आणि वनऔषधीचा खजिना
साताऱ्यामध्ये आले की पूर्व बाजूला जरंडेश्वरचा एक उंच डोंगर सहजच आपले लक्ष वेधून घेतो. खरं तर ‘श्वर’ म्हणजे शंकरस्थान. पण या ठिकाणी मुख्य मंदिर आहे ते हनुमानाचे. जरंडेश्वर हा डोंगर चोहोबाजूंनी सपाट जमीन असलेला असून सह्याद्रीची रांग सोडून अगदी दिमाखात उभा आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३७६० फूट इतकी आहे. पुराणकाळातील या डोंगराबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. रामायणातील युद्धकांडात रावणपुत्र इंद्रजिताच्या बाणाने लक्ष्मण जखमी झाला होता. त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी वैद्यांनी द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी ही औषधी वनस्पती आणण्यास सांगितली. हनुमानाने ती जबाबदारी स्वीकारून अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्यावेळी त्या पर्वताचा एक भाग खाली पडला तो म्हणजे जरंडेश्वर डोंगर. जरंडेश्वरवर डोंगरावर भरपूर प्रमाणात औषधी वनस्पती सापडतात. येथील वनस्पती एकूण १२० रोगांवर उपयोगी पडतात असे स्थानिक सांगतात. श्री जरंडेश्वरबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे भगवान शंकरानी याच ठिकाणी जरासुराचा वध केला तसेच जरंडेश्वर मंदिर समर्थांनी बांधल्याचेही सांगितले जाते. या मंदिराचा सभामंडप १९३० च्या सुमारास दासगिरी महाराजांनी बांधला. या मंदिराचे बांधकाम घडीव दगडांचे असून याचा सभामंडप प्रशस्त असून त्याचे संपूर्ण रंगकाम करण्यात आले आहे.
या श्रावणात जरंडेश्वर Jarandeshwar ला कसे जाल Jarandeshwar Trek
श्री जरंडेश्वरया ठिकाणी येण्यासाठी चार मार्ग आहेत. पहिला मार्ग सातारामार्गे त्रिपुटी व पुढे जांबवरून यावे लागते. साताऱ्यापासून त्रिपुटीमार्गेवर चढण्यासाठी असणारी पाऊलवाट अवघड असली तरी सुरक्षित मानली जाते. या वाटेने मंदिरापर्यंत जाण्यासाठी सर्वात जास्त गर्दी असते. याच्या पायथ्याला वाहनतळासाठी मोठी जागा आहे. तेथे वाहने पार्क करून भक्तगण वर मंदिराच्या दिशने जातात. दुसरा मार्ग सातारा रोड पाडळीमार्गे असून या मार्गांनी येताना जवळपास १२०० पायऱ्या लागतात. या दोन्हीही मार्गावरून येताना वन विभागाच्या वतीने या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. जागोजागी पायऱ्या, आजूबाजूला पक्ष्यांची माहिती देणारे फलक, अधेमध्ये आकर्षक लाकडी बाक आहेत. तिसरा मार्ग शिवथरकडून भीमनगरमार्गे आहे तर चौथा मार्ग कोरेगावकडून येताना जळगाव मार्गे असून तो मार्गही सोपा आहे.
असा आहे जरंडेश्वरचा डोंगर आणि माहिती Jarandeshwar Trek
जरंडेश्वर Jarandeshwar Trek डोंगरावर पोहचल्यावर डोंगरमाथ्यावर समोरच आपल्याला हनुमानाचे मोठे मंदिर दिसते. कुठूनही वरती आले की प्रथम एक मोठे पिंपळाचे झाड आणि त्याच्याशेजारी एक चौथरा आहे, त्या ठिकाणी आपण येतो. या ठिकाणी आल्यावर डोंगर चढताना होणारा त्रास, येणाऱ्या वाऱ्यामुळे अगदी नाहीसा होतो. या चौथऱ्याच्या बाजूला बाकोबा नावाच्या बोक्याचे एक छोटेसे स्मारक आहे. मंदिरासमोर सुमारे ३०० वर्षांपूर्वीची दीपमाळ आहे. मंदिर एक मीटर उंच चौथऱ्यावर बांधलेले असून गाभाऱ्यातील समर्थांनी स्थापलेली हनुमानाची मूर्ती स्वयंभू आहे. भोवताली गुलमोहोराची झाडे आहेत. आणखीही काही मंदिरे, गो-शाळा या परिसरात आहेत. मारूती मंदिरात महादेवाची पिंड आहे. या मंदिराचा सभामंडप शिवाय मंडपामध्ये जरंडेश्वरावर राहिलेल्या स्वामींच्या, रामदास, शिवाजी महाराज, तुकाराम यांच्या सुबक मूर्ती आहेत. त्याचबरोबर पुराणातील आणि शिवचरित्रातील काही प्रसंगही या ठिकाणी रेखाटले आहेत.
श्री जरंडेश्वर मंदिराच्या डावीकडील बाजूस असलेल्या एका खोलीमध्ये अत्यंत पुरातन काळातील मोठे जाते आहे. हे जाते प्रत्यक्षात सितामाईंनी वापरले असल्याचे सांगितले जाते. जरंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला दासमारुतीचे छोटे मंदिर आहे. याच्यासमोरच श्रीराम मंदिर आहे. या मंदिराची उभारणी १८६२ च्या सुमारास काळोजीबुवांनी केली.
या मंदिर बांधणीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. काळोजी बुवांना मंदिर (राम) जरंडेश्वराच्या पुढे बांधावे की मागे असा प्रश्न पडला. त्या वेळी त्यांना हनुमानाने दृष्टांत दिला आणि सांगितले की, श्रीराम माझ्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे हे मंदिर माझ्या मागच्याच बाजूस बांधण्यात यावे. हे राममंदिरही एका चौथऱ्यावर बांधलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शिवाय गणेशाची एक छोटी मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेरील मंडपामध्ये द्वारपालांच्या साडेपाच फुटी मूर्ती आहेत. राममंदिर आणि जरंडेश्वर मंदिर या दोन्हींची बांधणीही हेमाडपंथी पद्धतीची आहे.
राममंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. याच्याजवळ मोठ्या आकाराचे पाच-सहा दगडी गोटे आहेत. जरंडेश्वराच्या उजव्या बाजूला मंदिराची देखरेख करण्यासाठी असणाऱ्या पुजाऱ्यांचा मठ आहे. श्रीराम मंदिराच्या मागे थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला २०-२५ फूट पायऱ्या उतरून खाली उतरल्यानंतर एक घळ दिसते. येथे काळ्या पाषाणात एक चौकोनी गुहा तयार केलेली आहे. या ठिकाणी चार-पाच मोठे मोठे दगड नैसर्गिकरित्या एकमेकांवर अडकून तयार झालेली गुहा म्हणणे जास्त योग्य होईल. सध्या त्यामधे पादुका स्थापन केलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी श्रीसमर्थ आपल्या जरडेश्वरावरील वास्तव्यात एकांतवासात प्रभू रामचंद्राचे स्मरण करण्यासाठी या घळीमध्ये येऊन बसत असत.
यामध्ये आज एखादाच माणूस बसू शकेल एवढी जागा आहे. समर्थांच्या उपासनाघळींपैकी सर्वांत साध्या प्रकारची असणारी ही घळ आहे. इ.स. १६४५ साली याच घळीत समर्थ उपासनेसाठी आले असल्याची नोंद आहे. इ.स. १६५५च्या सुमारास जरंडेश्वरवरती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व शनिवार सीता यांनीही काही काळ येथे वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. या देवस्थान परिसराच्या ठिकाणी अनेक साधुनी तपश्चर्या केली असल्याचेही सांगितले जाते. असे हे जरंडेश्वर स्थान खऱ्या अर्थाने पाहण्यासारखे आहे. Jarandeshwar Trek जरंडेश्वर मंदिर परिसरात केवळ मंदिर व दोन-तीन छोट्या खोल्या आहेत.
डोंगरावर Jarandeshwar Trek जरंडेश्वर येथे पाऊलवाटेने चढत जात असताना हिरवीगार सृष्टी, थंडगार हवा आणि उंचावरून खाली दिसणारी टुमदार गावे मनाला भुरळ पाडतात आणि हे दृश्य अत्यंत विलोभनीय असते. वर चढून गेल्यावर मंदिराचा परिसराचा अत्यंत शांत व मनाला ताजेपणा देणारे वातावरण क्षणात भक्तांचा शीण घालवते. दर शनिवारी सातारा शहरातून कित्येक जण जरंडेश्वराच्या दर्शनाला आणि ट्रेकिंगचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येतात. डोंगरावर शुष्क, खुरटी, पानझडी झाडे विपुल प्रमाणात आहेत. दुर्मिळ वनौषधी आहेत, रानभाज्या आहेत. प्रचंड जैवविविधता आहे. या देवस्थानास शासनाने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिला आहे.
जरंडेश्वरवरून उतरत असताना मध्यातून डावीकडे गेल्यास थोड्या आतमध्ये बारा बैलांची गुहा आपल्याला पहावयास मिळते. गडावरील मंदिर बांधताना बैलांनी येथील दगड वाहून नेण्यास भरपूर मदत केली असे स्थानिक सांगतात.येथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचे तळे लागते. जरंडेश्वरवरून अजिंक्यतारा, यवतेश्वर, मेरूलिंग, वैराटगड, चंदन, वंदन, नांदगिरी, वर्धनगड, पाटेश्वर, जनाई मळाई अशा बऱ्याच गड व डोंगर टेकड्या पहावयास मिळतात.
सातारा ते जरंडेश्वर हे अंतर १५ कि.मी. असून साताऱ्याहून कोरेगावकडे जाताना त्रिपुटी हे गाव लागते. त्रिपुटीत गोपालनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे. त्याच्यालगतच खूप मोठा बांधीव तलाव आहे. बाजूला गोपालनाथ महाराजांचा मठ आहे. मठाच्या बाजूला एक विहीर आहे. त्रिपुटीतून जांब गावाकडे जाणाऱ्या मार्गावर हनुमानाची एक मोठी मूर्ती आहे. पुढे डावीकडे जांबकडे एक रस्ता जातो. त्या रस्त्याने जरंडेश्वरच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. गडावर पोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. गडावर राहण्याची सोय होऊ शकते. सध्या गडावर खाण्या पिण्याची सोय व्हावी म्हणून छोट्याश्या हॉटेलची व्यवस्था केलेली आहे.
तर या श्रावण महिन्यात जरंडेश्वर ला नक्की भेट द्या आणि आम्हालाही अभिप्राय कळवा. Jarandeshwar Trek
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर – ९९७५७५९३२५
(लेखक हे प्राध्यापक असून इतिहास व पर्यटनावर विविध माध्यमांवर लिखाण प्रसिद्ध आहे)
https://maharashtraone.com/?p=462: Jarandeshwar Trek: श्रावणात अनुभवा सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर मारुतीच्या भक्तीचा ट्रेक