Mahadev: दुष्काळाचे सावट जाण्यासाठी महादेवाला साकडे
तेजस लेंभे/ कोरेगाव
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली, असून पाण्याची समस्या भेडसावत आहे. शेतकरयांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत. घेवडा पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशावेळी दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी पिंपोडे बुद्रुक येथील गावकऱ्यांनी महादेवालाच Mahadev पाण्यात कोंडले व पावसासाठी साकडे घातले.
कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी पाऊस पडावा व दुष्काळ दूर व्हावा यासाठी गावातील नागेश्वर मंदिराला साकडे घातले. ग्रामस्थ व महिलांनी दीड किलोमीटर अंतरावरून पाण्याने भरलेले हंडे घेऊन नागेश्वर मंदिरातील शिवलिंगाला जलाभिषेक करत पावसासाठी देवाला साकडे घालुन मंदिरातील गाभारा पाण्याने भरला. कोरेगाव तालुक्यात यावर्षी दोनशे मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला आहे.या घडीला उत्तर कोरेगाव भागाला दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. येणाऱ्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर , भागात गंभीर दुष्काळी परिस्थिती सामना करावा लागणार आहे. या भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पाऊस नसल्याने या भागातील तलाव कोरडे पडले आहेत.तलावात पाणी नसल्याने भागातील गावांच्या नळपाणी पुरवठा योजना सुद्धा बंद आहेत.एका बाजूला थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर उत्तर भागातील शेतकर्यांनी पेरण्या केल्या, मात्र, नंतर पाऊसच न झाल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत.त्यामुळे भीषण दुष्काळाची चिंता ग्रामीण भागातील जनतेला भेडसावत आहे. आणि वरून राजाचे आगमन होण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या सर्वत्र वापरल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पिंपोडे बुद्रुक येथील नागरिकांनी देवाचा धावा करीत नागेश्वर मंदिरात जलाभिषेक करून पाऊस पडावा यासाठी शेतकर्यांनी आणि नागरिकांनी मंदिराच्या संपूर्ण गाभार्यात पाणी भरून देव पाण्यात ठेवले.गाभाऱ्यात पाणी भरून शिवलिंग पाण्यात बुडाले तर चांगला पाऊस पडतो अशी येथील नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कुठे तरी देव समाधानकारक पाऊस पाडेल अशी अपेक्षा येथील शेतकरी आणि नागरिकांना आहे.
नागेश्वराला श्रद्धा आणि भक्तिभावाने कोंडले ही पिढ्यानपिढ्याची परंपरा
पिढ्यानपिढ्या ही परंपरा आमच्या गावात चालत आलेली आहे.जुन्या लोकांच्या सांगण्या नुसार ज्यावर्षी पाऊस पडत नाही दुष्काळाचे सावट असते तेव्हा या नागेश्वराला श्रद्धा आणि भक्तिभावाने कोंडले की या देवाची आपल्यावर कृपा होऊन चांगला पाऊस पडतो.या गावातील नागरिकांनी याचा अनुभव घेतलेला आहे.
-सागर लेंभे
नागरिक पिंपोडे बुद्रुक