Satara: आमदार महेश शिंदे यांनी निवेदन देत केली मागणी
शेतकऱ्यांना उद्योगमंत्री उदय सावंत यांची ग्वाही
Satara: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण बागायती क्षेत्र असलेल्या वर्णे, निगडी तर्फ देवकरवाडी येथील शेतकर्यांच्या नशिबी आलेले औद्योगिक वसाहतीचे शिक्के आता सातबार्यावरुन कायमस्वरुपी हद्दपार होणार आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी हा निर्णय घेतला असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी होणार असल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. एकंदरीत आमदार महेश शिंदे यांनी शेतकरी हितासाठी पुढाकार घेतल्याने मतदारसंघामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Satara तालुक्यातील वर्णे, निगडी तर्फ देवकरवाडी येथील ग्रामस्थांचा शेती हाच पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीवरच संपूर्ण कुटुंब अवलबूंन असताना राज्य शासनाने अचानकरित्या शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर औद्योगिक परिक्षेत्रासाठी अधिग्रहीत असे थेट शिक्केच मारले आणि शेतकर्यांच्या समस्यांमध्ये मोठीच वाढ झाली. मुळातच वर्णे व निगडी तर्फ देवकरवाडी परिसरापासून सातारा औद्योगिक वसाहत व अतिरिक्त औद्योगिक वसााहत असताना जाणीवपूर्वक शेतकर्यांच्या जमिनी बळकावण्याचा हेतूने राजकीय शक्तींनी शेतकर्यांच्या सातबारावर अधिग्रहणाचे शिक्के मारल्याने शेतकरी व्यतिथ झाले होते.
आमदार महेश शिंदे हे सातारा तालुक्याच्या दौर्यावर आले असताना, त्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. आमदार महेश शिंदे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये या विषयावर प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर अधिवेशन काळातच विधानभवनातील कार्यालयात उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांची शेतकर्यांसमवेत भेट घेऊन विदारक परिस्थिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्यावर ना. सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकार्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, तात्काळ प्रभावाने शिक्के उठविण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य : आ. महेश शिंदे
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान् य शेतकर्यांना न्याय देण्यासाठी पहिल्या दिवसापासून कटीबध्द आहे. एकाही शेतकर्यावर अन्याय होता कामा नये, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. वर्णे, निगडी तर्फ देवकरवाडी येथील शेतकर्यांनी औद्योगिक वसाहतीबाबत शिक्के सातबारा उतार्यावर मारले असल्याचे निदर्शनास आणून दिले. मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाला कोणत्याही पध्दतीचा विरोध नाही, मात्र बागायती जमिनी घेऊन औद्योगिक विकास करणे अयोग्य होणार असल्याने तातडीने उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. विधीमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारकडून म्हणणे जाणून घेतले आणि तातडीने शिक्के उठविण्याची कार्यवाही करण्याबाबतचा शब्द घेतला होता. शेतकर्यांची उद्योग मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन हा विषय कायमस्वरुपी संपविला असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.