freedom fighters: कोरेगाव तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार
freedom fighters: स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचा सन्मान करताना मनात देशाविषयी गौरवाची भावना निर्माण होते, असे प्रतिपादन काडसिद्ध कोविड टास्क फफोर्सच्या प्रमुख डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा एक भाग म्हणून महसूल प्रशासन व आमदार महेशदादा शिंदे विचार मंचच्यावतीने स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळ्यांतर्गत रविवारी कोरेगाव शहर आणि तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विशेष गौरव देखील करण्यात आला. त्याप्रसंगी संवाद साधताना डॉ. शिंदे बोलत होत्या.
तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नायब तहसीलदार उदयसिंग कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उफर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक राजेंद्र वैराट, संतोष बर्गे, अर्जुन आवटे, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी निलेश यादव, तलाठी के. टी. पवार यांच्यासह प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणे हा भाग्याचा क्षण आहे. स्वतंत्र भारताला विकासाची दिशा दाखविणारा आणि नव्या पिढीला देशासाठी त्यागाची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी सर्व स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे जोडीदार यांचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याचे भाग्य मिळाले असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
महसूल प्रशासनाच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबियांबाबत सकारात्मक दृष्टिकोन असून त्यांच्या अडीअडचणी वेळोवेळी प्राधान्यक्रमाने सोडविल्या जात असल्याचे तहसीलदार डॉ. कोडे यांनी सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाची माहिती आणि देशाच्या प्रगतीसाठी आपल्या क्षमतेचा उपयोग करावा याची प्रेरणा देण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. कोडे यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिक वसंतराव दीक्षित, स्वातंत्र्यसैनिक विधवा पत्नी लक्ष्मीबाई पोतेकर, पार्वती माधव पिसाळ, रुक्मिणी गणपती कापसे, सुभद्रा पांडुरंग बोराटे व सुशिला जर्नादन पुराणिक यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना विभागातील सेवाभावी कर्मचारी अर्चना बुधावले, कोतवाल सुरज सरगडे यांच्यासह महसूल प्रशासनातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.