पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी,
BANKING NEWS: पश्चिम महाराष्ट्रात ५३ शाखांचा विस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेस अहवाल सालात ६ कोटी ६३ लाख ढोबळ नफा झाला असून आवश्यक तरतूदी वजा जाता निव्वळ नफा ४ कोटी १ लाख ४८ हजार झालेला आहे.त्यातून सभासदांना ६ टक्के लाभांश वाटणी करण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी संस्थेच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना दिली.
पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पिंपोडे बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज सांस्कृतिक भवनमध्ये शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ.सोपानराव चव्हाण होते.प्रारंभी मागील सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करण्यात आले.प्रास्ताविक व स्वागत करताना संस्थापक लेंभे यांनी सभेपुढे ठेवलेल्या विषयांचे वाचन केले.सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावून एकमताने मंजूरी दिली. गतवर्षीच्या संमिश्र व्यवसायात १६८ कोटी ८७ लाखांची वाढ झालेली असून ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेचा संमिश्र व्यवसाय ११६५ कोटी ४ लाख झालेला आहे.अहवाल सालात सर्वच बाबतीत लक्षणीय वाढ झालेली असून ठेवींमध्ये ९० कोटी ५ लाखांची वाढ होऊन ३१ मार्चअखेर ६६१ कोटी २९ लाख ठेवी जमा झालेल्या आहेत.गेल्या ३५ वर्षात ही सर्वात जास्त विक्रमी वाढ झालेली असून याचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ, सल्लागार, खातेदार, ग्राहक, सभासद व सेवक वर्ग यांना जाते.गेली ३४ वर्षे प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना आदर्श परंपरा लाभलेल्या या संस्थेचा अभिमान वाटतो.संस्थेचे खेळते भांडवल ७४२ कोटी ७५ लाख असून ७२७०३ सभासद संख्या आहे.संस्थेचा स्वनिधी अद्यापही कमी असून भागभांडवल वाढविणे आवश्यक आहे.त्यासाठी सर्व सभासदांनी संस्थेचे जास्तीत जास्त भाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले.चेअरमन डॉ.सोपानराव चव्हाण म्हणाले, सेवकांना कर्जवाटप वाढ, व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट दिले आहे.यावर्षी कसल्याही परिस्थितीत ६ कोटींचा नफा संस्थेस झाला पाहिजे.म्हणजे पुढील वर्षी यापेक्षा जास्त लाभांश सभासदांना देता येईल.
व्हाईस चेअरमन श्रीकांत शेटे, जेष्ठ संचालक सुरेशबापू साळुंखे, अशोकराव लेंभे यांची भाषणे झाली.प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन व प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून पिंपोडे बुद्रुक येथील जेष्ठ किर्तनकार ह.भ.प.आनंदराव लेंभे शास्त्री नाना यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले.कार्यकारी संचालक भावेश ढमाळ यांनी आभार मानले.व्यासपिठावर संचालक रावसाहेब लेंभे, जयवंत घोरपडे,भरत साळुंखे, हणमंतराव निकम, तात्यासाहेब ढमाळ, संजय भोसले, श्रीमती सुलभा अरूण साळुंखे,सौ.उषा अशोकराव पवार, गौतम कांबळे, सतीश बिचुकले, नारायण सोनावणे, विजय पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.सभेस सभासदांची लक्षणीय उपस्थिती होती.