गेट टुगेदरने काय मिळवले- बालपणीच्या आठवणींना उजाळा आणि पुन्हा मोठेपणी ते दिवस जगण्याची संधी
काल आमच्या देऊर (ता. कोरेगाव) च्या श्री मुधाई देवी विद्यामंदिर च्या दहावी बॅचच्या मैत्री परिवाराचे गेट टुगेदर सोळशी येथे संपन्न झाले आणि अनेक दिवसापासून सुरु असलेल्या चर्चेला मूर्त रूप येऊन हा सोहळा आनंदात पार पडला. अनेक मित्रांनी यात अगदी उस्फुर्त सहभाग घेतला अनेकांना इच्छा असूनही येता आले नाही सो असो.
आपला मित्र शिवाजीने यावेळी नाताळच्या सुट्टीत गेट टुगेदर चा निर्धार केला होता आणि तो पूर्णत्वास गेलाही त्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले.
स्वतःच्या नोकरीं, व्यवसाय, उद्योग,घरकाम हे सर्व सांभाळत सर्व मित्र मैत्रिणींना कॉन्टॅक करणे हा टास्क अवघड होता. खरं तर सहा महिन्यात पुन्हा गेट टुगेदर यशस्वी होईल याची शंका होती पण शिवाजीने ती फोल ठरवत मेहनत घेतली.
मित्रांची भेट होणे हे एक कारण यावर वरचढ ठरले.
कॉन्टॅक्ट करण्यापासून त्याना यासाठी तयार करणे ही बाब वाटतं तेवढी सोप्पी न्हवती
अनेकांना अनेक अडचणी होत्या, कुणाला सुट्टी मिळत नव्हती, कुणाला बाहेरगावी जायचं होत तर कुणाकडे आजारपण, कुणाची वर्षाखेर अशी अनेक कारणे पण मित्रांची भेट होणे हे एक कारण यावर वरचढ ठरले.
आणि या सोहळ्याला सुमारे २५ जण एकवटले. शेवट पर्यंत किती लोक येणार याची काळजी शिवाजीसह बॅक टीमला होती, ग्रुपवर उघडपने कोणच दिलखुलास आपली मते मांडत न्हवते त्यामुळे ही काळजी आणखी वाढली पण जेवढी लोक येथील तेवढी सोबत घेऊन किल्ला जिंकायचा हा निर्धार होता.
मुलींनी मारली बाजी
तसं मुलींना फोन कोणी करायचे हा प्रश्न आला यावेळी सारिका, पुनम, पुनम, राजश्री, रूपाली, दिपाली, हेमा व बाकीच्या मुलीनी यावेळी ही जबाबदारी घेतली आणि घरकाम व सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत वर्गातील अनेक मैत्रिणींना त्यांनी दररोज फोन करणे सुरु केले. त्यांना तयार करणे म्हणजे सासरच्या माणसानाचा होकार महत्वचा टास्क त्यांनी तो पार पाडत मुलींचे संख्याबल वाढवलं त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्रमाणे इथही मैत्रीचे महायुती सरकार यशस्वी झाले.
शिवाजीराजेना बॅक टीमच्या मावळ्यांच्या सपोर्ट, कॅन्सल ते मागे हटू नको हा विश्वास
एके संध्याकाळी ग्रुपवर कोणीच प्रतिसाद देत नाही पाहुन नाराज शिवाजीने गेट टुगेदर कॅन्सल करतो अशी भावना व्यक्त केली. यावर मग पडद्यामागे सूत्र गतीने फिरू लागली, देऊर ते मुबंई, पुणे, सातारा, पळशी, दहिगाव, बिचुकले अशा मावळ प्रांतातील शैलेश, योगेश, अमर, अजित, विशाल, योगेश,नारायण, अरुण असे मित्र सरदार पुढे आले, फोना फोनी झाली, गुप्त बैठका,मोर्चेबांधणी सुरु झाली अन मध्यरात्री उशिरा गेट टुगेदर होणारच हा विश्वास शिवाजीला त्यांच्या मित्रांनी दिला. आन मोहिमेला पुन्हा जोमाने कामाला लागले.. मित्राची सपोर्ट सिस्टीम काय असते त्याची अनुभूती आली.
अखेर गेट टुगेदरचा दिवस उजाडला
रविवारी सकाळी वेदी रिसॉर्टला गेट टुगेदरचा दिवस उजाडला, वाई प्रांतातील मुलींना आणण्यासाठी अजित देशमुख स्वतः पुढे सरसवले, त्यांनी सर्वाना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले तर फलटण कोरेगाव भागातील मुलींसाठी शिवाजीने व्यवस्था केली. सकाळी साडे दहालाच अजित सोबत पहिली तुकडी गडावर पोहचली तर शिवाजी दुसरी तुकडी घेऊन लागोलग पोहचला. मागोमाग विशाल, शैलेश, शरद, योगेश, योगेश अशी मंडळी जमली पण मुलींची संख्या ज्यादा अन मुले पाच सहा त्यामुळे पुन्हा शिवाजीच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला, अखेर बाराच्या सुमारस आपापली कामे मार्गी लावून एक एक सवंगडी येऊ लागला, अरुण, किशोर यांच्या यांच्या पाठोपाठ अमर, शिवाजी देवा, किरण, माऊली टीम दाखल झाली. मग खऱ्या अर्थाने स्नेहमेळाव्याला रंगत आली.
वीस तीस वर्षांनी भेटलेले चेहरे ओळखणे इथपासून अस्थेवाईक पणे विचारपूस असा सुरु झालेला संवाद पुढे चेष्टा आणि हास्य यात रमला. उद्योग व्यवसाय, शिक्षण, नोकरीं, शेती, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आपल्या मित्रांच्या अनुभवाचा, ज्ञानचा उपयोग व्हावा हा खरा उद्देश तोही सफल झाला, शाळेतील आठवणीनी तर जादूच्या पोतडीतील जादू प्रमाणे एक एक बाहेर येऊ लागल्या.. त्या अगणित आठवणींनी प्रत्येक जण भाव विभोर झाला.
वीस पंचवीस वर्षानी खेळाच्या मैदानात मुले मुली
देऊरच्या आपल्या बॅचच्या खो खो टीम मग ती मुलांची असो वा मुलींची तालुक्यात दबदबा होता, मग एकत्र आल्यावर खो खो झालाच पाहिजे, अजित ने शिट्टी वाजवली आन सर्वांच्यातला बालपणीचा खेळाडू जागा झाला, मग लॉनवर रंगला खो खो चा मुले विरुद्ध मुली मैत्रीचा सामना. सुजाता ने मारलेला धप्पा, राजश्रीची डाईव्ह, योगेशचा सूर, दीपालीची धाव, शरदच्या उड्या, सुषमा, मंगल, हेमा, पुनम यांनी संघाची उचलेली बाजू इकडे शैलेश, अमर, विशाल, शिवाजी फौंजी, किरण, माऊली, देवा यांनी मुलानाच्या संघासाठी तत्परता दाखवली.
खो खो झाला की कब्बडी कब्बडी आवाज घुमला
खो खो खेळून दमलेल्या मुलींनी लॉनवर बैठक मारली पण मुलानी कबड्डी चे मैदान सुरु केले, कब्बडी खेळायची म्हटल्यावर मैदान आखयल्ला फक्की नसली आमचं अडतं कुठं, ठिबकच्या पडलेल्या पाईपनी ही मैदान होत हे दाखवून दिले, मग घुमला कबड्डी कबड्डी चा आवाज, इतकावेल शांत असलेला अमर मग ऍक्टिव्ह झाला त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णीय होता. माऊलीची पकड, शैलेशची राईड, किरणाची विकेट, योगेशाचा बोनस पॉईंट, अजितची जोरदार राईड सगळं कसं…. लहानपणीची या पोरांची मैदानातील खेळ आठवणी जाग्या करणारे. मग व्हालिबॉल आणि क्रिकेट ही झालं. इकडं राजश्रीच्या छोट्या ईशाला खो खो कुणी घेतलं नाही म्हणून तीने केलेला बाल हट्ट यामुळे ईशासाठी पुन्हा मुलींनी खोखो सुरु केला, तर स्वराने क्रिकेटचे धडे गिरवले. किशोर आणि अरुण यांनी खेळ खेळला नाही तरी ते क्षण कॅमेऱ्यात कैद करणायची भूमिका निभावली.
जाताना डोळ्याच्या कडा ओलावल्या,
शाळेच्या मित्र मैत्रीण यांनी भरवलेले एकदिवसाचे संमेलन दिवस मावळतिकडे झुकला तसा निरोपाकडे आला आणि चला जातो म्हणत पुन्हा पुन्हा शेक हॅन्ड करीत मैत्रीचा हात घट्ट पकडणारे मित्र त्यांचा पाय अडखळत होता तर तिकडे मुलीही एकमेकींना निरोप देताना डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या, त्यांचा चिवचिवाट शांत झाला होता.. नीट जा, काळजी घे, फोन कर, पुन्हा भेट नक्की अशा सूचना एकमेकिना करताना भेट संपतेय याच्या जाणीवने त्यांना आतून दाटून येत होते. पुन्हा एकत्र भेटन्याच्या संकल्पसॊबत
अखेर काय मिळवले या गेट टुगेदर ने
शाळेचे ते निरागस दिवस, निखळ, निर्मल आणि दृढ करणारे मैत्रीचे नातं, सुखात मागे आणि दुःखात पुढे येणारे दोस्तांचे हात, अडचणीत आधार बनून उभे राहणारे, दिशा दाखवणारे, प्रेरणा देणारे मित्र मैत्रिणी… आणि पैशातही न मोजता येणाऱ्या शेकडो आठवणीची शिदोरी सोबतीला एक मैत्रीचा समृद्ध परिवार.. कायम भक्कम सोबत उभा राहणारा.
🙏🏻प्रकाश राजे