आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात समाजजीवनाच्या आमुलाग्र बदलासाठी दिलेले योगदान लक्षांत घेऊनच त्यांचा नावाने महाराष्ट्र शासन आदर्श पत्रकारास आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देत असते. असे प्रतिपादन सातारा समाचारचे संस्थापक संपादक संजय कदम यांनी प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर मध्ये आयोजित ‘मराठी पत्रकारिता दिन २०२५’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक शेलार यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले बाळशास्त्री जांभेकरांनी ०६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले म्हणूनच महाराष्ट्रात ०६ जानेवारी हा दिवस पत्रकारिता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांच्या कार्याचे अखंड स्मरण ठेवून बदलत्या काळाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी पत्रकारिता सजग व समर्थ ठेवली पाहिजे.” या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या कार्यकारणीवर सदस्य म्हणून सातारा जिल्हा ग्रामीण विभागातून बिनविरोध निवड झालेले महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय शेडगे यांना महाविद्यालयाच्या वतीने शाल, गुलाबपुष्प व मुधाई नियतकालिक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी दै.पुढारीचे पत्रकार कमलाकर खराडे यांनी आदर्श पत्रकार कसा असावा त्याच्या अंगी कोणते गुणविशेष असावे. याचे सोदाहरण विवेचन केले. “पत्रकाराकडे समाजभान असावयास हवे. समाजविधायक दृष्टीने व संयमाने केलेल्या बातमी लेखनात समाज घडविण्याची ताकत असते. ती ताकत ओळखून तरुणांनी या क्षेत्रात आले पाहिजे.” असे सांगतानाच त्यांनी या क्षेत्रातील करिअरच्या संधी महाविद्यालयीन तरुणासमोर ठेवल्या. दै.ऐक्यचे पत्रकार रणजीत लेंभे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. “पत्रकारिता हा व्यवसाय नसून ते बुद्धयाच स्वीकारायचे सतीचे वाण” असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी चवरे यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना पत्रकारिता क्षेत्राने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात दिलेले योगदान सोदाहरण विद्यार्थांना उलगडून दाखविले. व या क्षेत्रातील कर्तृत्वाच्या संधीकडे विद्यार्थाचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहायक प्राध्यापक सुर्यकांत अदाटे यांनी तर आभार डॉ. चंद्रशेखर भारती यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सहायक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संखेने उपस्थित होते.