Pashudhan Vikas Yojana 2026: पशुधन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा! जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांचे आवाहन; वाघोलीत पिंपोडे बुद्रुक गट पशुसुधार समिती स्थापन

रणजित लेंभे | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
Pashudhan Vikas Yojana 2026 शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला प्राधान्य देऊन आपले पशुधन वाढवावे. तसेच पशुधनाचा विमा काढून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी केले आहे.
वाघोली येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पशुसुधार समितीच्या सभेत ते बोलत होते. शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत ही सभा अत्यंत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
शासकीय योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश
सभेत अमित चव्हाण यांनी उपस्थित शेतकरी व पशुपालकांशी थेट संवाद साधला. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबवून, पात्र लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी डॉ. विरकर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजना, पशुधनाची योग्य निगा, त्यांचे आरोग्य आणि विम्याच्या महत्त्वाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पिंपोडे बुद्रुक गटाची पशुसुधार समिती स्थापन
या सभेचे औचित्य साधून ‘पिंपोडे बुद्रुक’ गटाची नवीन पशुसुधार समिती अधिकृतपणे स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून आगामी काळात परिसरातील पशुपालकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासोबतच शासनाच्या विविध योजना तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास कोरेगाव पंचायत समिती सदस्या सौ. रुपालीताई साळुंखे, सुधीर साळुंखे, भाजप युवा नेते कुमार भोईटे, नरेंद्र वाघंबरे, सरपंच अमिता भोईटे, अरुणा बेस्के, संतोष उगले, पूजा शिंदे, श्रीकांत जगताप यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











