Fact Check: आजचा दिवस खूप खास आहे आणि असा दिवस हजार (1,000) वर्षांतून एकदाच येतो. ‘जन्मवर्ष + वय = २०२६’ ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

१,००० वर्षांतून एकदा येणारा हा चमत्कार की केवळ गणिताची सोपी ट्रिक? जाणून घ्या सत्य
मुंबई | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
Fact Check सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर सध्या एक मेसेज वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, ‘चालू वर्षात तुमचे वय आणि तुमचे जन्मवर्ष यांची बेरीज केली तर उत्तर २०२६ येते. हा एक १,००० वर्षांतून एकदाच येणारा चमत्कार आहे आणि याचं स्पष्टीकरण तज्ज्ञांकडेही नाही.’ या व्हायरल दाव्यामुळे युझर्समध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले असून प्रत्येकाकडून स्वतःचे वय तपासून पाहिले जात आहे.
हा चमत्कार की गणिताची साधी ट्रिक?
अनेक युझर्स याला चमत्कार मानत असले, तरी गणिताच्या दृष्टीने विचार केल्यास यात कोणताही चमत्कार किंवा गूढ रहस्य नाही. हे गणिताचे अत्यंत सोपे आणि स्वाभाविक सूत्र आहे. कोणत्याही वर्षी, जर तुमचा त्या वर्षातील वाढदिवस झाला असेल, तर तुमचे पूर्ण झालेले वय आणि तुमचे जन्मवर्ष यांची बेरीज केली तर उत्तर हे चालू वर्षच (उदा. २०२६) येणार.
उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म १९९५ मध्ये झाला असेल आणि २०२६ मध्ये त्याचा ३१ वा वाढदिवस झाला असेल, तर १९९५ + ३१ = २०२६ हेच उत्तर येणार आहे. अगदी याचप्रमाणे तुम्ही जर २०२५ मध्ये हे गणित केले असते तर उत्तर २०२५ आले असते आणि २०२७ मध्ये केले तर २०२७ येईल. त्यामुळे याला १,००० वर्षांतून एकदा येणारा ‘चमत्कार’ म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
सोशल मीडियावरील ‘व्हायरल ट्रेंड’ची गंमत
दरवर्षी कॅलेंडर बदलले की अशा प्रकारचे मेसेज नव्याने तयार करून १,००० वर्षे किंवा हजारो वर्षांचा चमत्कार म्हणून व्हायरल केले जातात. अशा व्हायरल पोस्ट्स केवळ लोकांचे मनोरंजन आणि कुतूहल वाढवण्यासाठी वापरल्या जातात. हा कुठलाही दिव्य चमत्कार नसून केवळ आकड्यांचा एक साधा खेळ आहे. त्यामुळे अशा व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घेऊन वाचकांनी गणितातील या गंमतीचा आनंद घ्यावा.










