
Vachan Prerna Din वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून शाळेला मदत; देऊर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-पालकांचा प्रेरक उपक्रम!
Vachan Prerna Din चे औचित्य साधून शालेय ग्रंथालयासाठी साडेतीन हजारांची पुस्तके भेट; कै. शालन आवळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आवळे भावंडांकडूनही शाळेला सप्रेम भेट
सातारा /प्रतिनिधी
Vachan Prerna Din मुलांच्या वाढदिवसावर होणारा अवाजवी आणि अनावश्यक खर्च टाळून तोच निधी शालेय ग्रंथालयासाठी देऊन शाळा समृद्ध करण्याचा एक अत्यंत आदर्श व प्रेरक उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देऊर येथील विद्यार्थी आणि पालकांनी सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरीतील विद्यार्थी प्रियांश किशोर कदम याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे आजोबा श्री. प्रकाश कदम यांनी २,००० रुपये, तर विद्यार्थी स्मित लक्ष्मण दोडके याच्या वाढदिवसानिमित्त श्री. लक्ष्मण दोडके यांनी १,००० रुपयांची रोख मदत शाळेला दिली होती. या दोन्ही पालकांनी दिलेल्या एकूण निधीतून सुमारे साडेतीन हजार रुपये किमतीची उत्कृष्ट पुस्तके खरेदी करून शालेय ग्रंथालयात भर घालण्यात आली.आज १५ ऑक्टोबर – ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून या सर्व नवीन पुस्तकांचे शाळेला अत्यंत उत्साही वातावरणात लोकार्पण करण्यात आले.
सामाजिक भान जपत आवळे भावंडांचा नवा आदर्श
दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी कै. शालन संपत आवळे यांच्या ६ व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून त्यांचे सुपुत्र श्री. गंगाधर आवळे व कन्या सौ. सोनाली अवघडे यांनी कौटुंबिक धार्मिक विधी किंवा कार्यक्रमांवर अतिरिक्त खर्च न करता, ती रक्कम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देऊर यांना सप्रेम भेट देऊन परिसरात एक नवा वस्तूपाठ घालून दिला.
मान्यवरांची उपस्थिती
या स्तुत्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. निलेश कदम, पालक श्री. गंगाधर आवळे, श्री. प्रकाश कदम, श्री. रोहित कदम, पालक सौ. स्मिता दोरके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. शोभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक सौ. सुनिता गायकवाड, सौ. वैशाली चव्हाण आणि श्री. रमेश चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले. उपस्थितांनी वाढदिवस व पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून शाळेला मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.











