Akshaya Tritiya 2026: सोने खरेदीचा अक्षय मुहूर्त, जाणून घ्या महत्व सोनेखरेदीचे महत्व

सोन्याच्या दराचा उच्चांक: तरीही ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह
प्रतिनिधी/महाराष्ट्र वन न्यूज
Akshaya Tritiya 2026 ‘अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस केवळ धार्मिक विधींसाठीच नाही, तर आर्थिक समृद्धीच्या दृष्टीनेही अत्यंत शुभ मानला जातो. याच विश्वासामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. यंदा सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठलेला असतानाही, श्रद्धेचा हा सुवर्णयोग साधण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.
धार्मिक संदर्भ: सोने खरेदी म्हणजे समृद्धीचे आमंत्रण
अक्षय तृतीयेचा आणि सोन्याचा संबंध केवळ शोभेपुरता मर्यादित नाही. पौराणिक कथांनुसार, या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. भगवान परशुरामांचा जन्म आणि अन्नाची देवी माता अन्नपूर्णा हिचा प्रकट दिनही याच दिवशी साजरा केला जातो. असे मानले जाते की, या शुभ मुहूर्तावर खरेदी केलेले सोने हे कुटुंबात अक्षय लक्ष्मीचा वास निर्माण करते. “जसा या दिवसाचा कधी क्षय होत नाही, तसाच या दिवशी घेतलेल्या सोन्याचा आणि त्यातून मिळणाऱ्या वैभवाचाही कधी क्षय होत नाही,” या श्रद्धेपायी सर्वसामान्य नागरिक अगदी लहान सोन्याची चतकोर मणी का असेना, पण खरेदी करण्याचा प्रयत्न करतात.
बाजारपेठेतील स्थिती: सोन्याचा भाव व ग्राहकांचा कल
सध्या सोन्याचे भाव १४००० ते १५००० प्रतिग्रॅमच्या आसपास रेंगाळत आहेत, तरी अक्षय तृतीयेचा उत्साह कमी झालेला नाही. सराफ बाजारात अक्षय तृतीया या दिवशी होणारी उलाढाल ही वर्षातील इतर दिवसांच्या तुलनेत कैक पटीने जास्त असते. दागिने खरेदी साठी महिला वर्गाचा ओढा प्रामुख्याने हलक्या वजनाचे (Lightweight) दागिने, जसे की नथ, वेढणी, आणि कानातील कुड्यांकडे आहे.तर काही जण गुंतवणुकीचा नवा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतात भाव वाढल्यामुळे अनेकांनी प्रत्यक्ष दागिन्यांऐवजी ‘गोल्ड कॉइन्स’ (सोन्याची नाणी) किंवा ‘वेढणी’ला पसंती दिली आहे, कारण त्यात घडणावळ कमी लागते.
परंपरा आणि आधुनिकतेचा संगम: डिजिटल सोने
काळाप्रमाणे सोने खरेदीची पद्धतही बदलली आहे. आजची तरुण पिढी प्रत्यक्ष दुकानात जाण्याऐवजी मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून ‘डिजिटल गोल्ड’ खरेदी करण्याला प्राधान्य देत आहे. मुहूर्त साधण्यासाठी ५०० किंवा १००० रुपयांचे डिजिटल सोने खरेदी करून आपली परंपरा जोपासणारा एक मोठा वर्ग निर्माण झाला आहे. यामुळे अक्षय तृतीयेचा हा सण आता पारंपारिक चौकटीबाहेर जाऊन हाय-टेक झाला आहे.
दानाचाही अक्षय महिमा
केवळ सोने खरेदीच नाही, तर या दिवशी केलेल्या दानाचेही फळ अक्षय मिळते. विशेषतः उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचे माठ (घडे), छत्री, पादत्राणे आणि अन्नाचे दान करण्याला या दिवशी महत्त्व दिले जाते. धार्मिक विधी आणि सोने खरेदी यांच्या मिलाफामुळे अक्षय तृतीयेला ‘समृद्धीचा सण’ म्हटले जाते.
हे पण वाचा gold vs silver investment सध्याच्या दरांनुसार गुंतवणूक: सोने घ्यावे की चांदी? तज्ज्ञ काय सांगतात.






