Deur Vitthal Temple Restoration प्रतिपंढरपूर देऊर येथील १२ व्या शतकातील पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातत्व विभागाच्या संचालकांची भेट;

मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने निधी देण्याची भाविकांची मागणी
सातारा | महाराष्ट्र वन न्यूज
Deur Vitthal Temple Restoration साताऱ्याची प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र देऊर येथील अंदाजे १२ व्या शतकातील पांडवकालीन दगडी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दुरवस्थेकडे अखेर पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले गेले आहे. पुणे येथील पुरातत्व विभाग प्रादेशिक कार्यालयाचे संचालक डॉ. विलास वहाने यांनी नुकतीच या पुरातन मंदिराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मंदिराची झालेली गंभीर पडझड पाहता, या ऐतिहासिक वास्तुचे अस्तित्व टिकवण्यासाठी राज्य शासनाने तातडीने भरीव निधी देऊन मंदिराचा जीर्णोद्धार करावा, अशी एकमुखी मागणी देऊर ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील लाखो भाविकांमधून केली जात आहे.
शिखराला तडे आणि पावसाच्या पाण्यामुळे मंदिराची दुरवस्था
देऊर येथील हे पांडवकालीन भव्य मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामातील आहे. सातारा जिल्ह्यातील पुरातन मंदिरापैकी एक आहे, हे मंदिर पुरातत्व विभागाकडे येत असून या विभागांचे मंदिर पुर्नजीवनासाठी काम करणे गरजेचे आहे, मंदिराची ग्रामस्थांनी डागडुजी केली मात्र ती अपुरी पडत आहे योग्य देखभालीअभावी मंदिराच्या शिखरावर पिंपळाची झाडे उगवल्याने शिखराला ठिकठिकाणी गंभीर तडे गेले आहेत. पावसाळ्यात शिखरातून थेट गाभाऱ्यात पाणी साचत असल्याने मंदिराच्या मूळ रचनेला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, मंदिराचे दगडी बीम (Beams) तडकल्याने त्यांना तात्पुरता लोखंडी पोलचा आधार देण्यात आला आहे. मंदिरातील दगडी फरशी आणि खांबही जीर्ण झाल्याने ऐतिहासिक वास्तु ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे.
पुरातत्व विभागाच्या संचालकांकडून स्थळ पाहणी आणि सूचना
मंदिराची ही दुरवस्था रोखण्यासाठी देऊर ग्रामस्थांनी पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे जीर्णोद्धाराची मागणी केली होती. याची दखल घेत प्रादेशिक संचालक डॉ. विलास वहाने यांनी मंदिराची सूक्ष्म पाहणी केली आणि संवर्धनासाठी आवश्यक त्या तांत्रिक सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान देऊर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन धनसिंग कदम यांच्यासह माऊली प्रासादिक मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून निधी द्यावा: भाविकांची अपेक्षा
दरवर्षी आषाढी-कार्तिकी एकादशीला आणि प्रत्येक वद्य-शुद्ध एकादशीला या मंदिरात हजारो भाविक भजन आणि प्रसादासाठी एकत्र येतात. जिल्ह्याचे मुख्य श्रद्धास्थान असलेल्या या प्रतिपंढरपूर मंदिराला मूळ रूपात टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विशेष लक्ष घालावे. राज्य सरकारने तातडीने निधी मंजूर करून हे ऐतिहासिक दगडी मंदिर काळाच्या पडद्याआड जाण्यापासून वाचवावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.












