Prashant Kishor Bankipur Election Win 2026: प्रशांत किशोर यांनी भाजपचा ३५ वर्षांचा गड उद्ध्वस्त केला! बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराजचा ऐतिहासिक विजय

पटना / बिहार | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
Prashant Kishor Bankipur Election Win 2026 बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत जनसुराज पक्षाचे (Jan Suraaj Party) प्रमुख प्रशांत किशोर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल ३५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा (BJP) अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा १९,३२४ मतांनी दारुण पराभव केला. या विजयामुळे प्रशांत किशोर यांनी थेट विधानसभेत प्रवेश केला असून जनसुराज पक्षाला पहिला मोठा विजय मिळाला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन राज्यसभा खासदार झाल्यामुळे बांकीपूरची जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी ६४,१५१ मते घेतली, तर भाजपचे नीरज कुमार ४४,८२७ मतांवर रोखले गेले. आरजेडीच्या (RJD) उमेदवार रेखा कुमारी अवघ्या १४,२७३ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. बिहारमध्ये भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
घरोघरी प्रचार आणि ३५ वर्षांच्या गडाला सुरुंग!
गेल्या दोन महिन्यांपासून प्रशांत किशोर यांनी बांकीपूर मतदारसंघात राबवलेली ‘डोर-टू-डोर’ प्रचार मोहीम, पदयात्रा आणि थेट स्थानिक मुद्द्यांवर दिलेला भर या विजयाचे मुख्य कारण ठरले. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या फौजसमोर प्रशांत किशोर यांनी अत्यंत शिस्तबद्ध रणनीती आखून भाजपच्या या मजबूत गडाला भगदाड पाडले. या विजयानंतर बोलताना, “हा बांकीपूरच्या जनतेचा विजय असून त्यांनी बदलासाठी जनादेश दिला आहे,” अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली.








