Pimpode Premier League : लोणंदच्या ‘सनराईज संघाची बाजी! जिमखाना पिंपोडे प्रीमियर लीग जिंकली, ३२ संघांचा थरार

ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ मिळणे गरजेचे – जि.प. सदस्य अमित चव्हाण यांचे हस्ते उदघाटन
रणजित लेंभे- महाराष्ट्र वन प्रतिनिधी
“ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आणि टॅलेंट आहे, गरज आहे ती त्यांना योग्य संधी आणि हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याची. Pimpode Premier League सारख्या विविध क्रीडा स्पर्धांमुळे त्यांच्यातील प्रतिभेला खऱ्या अर्थाने वाव मिळतो आणि भविष्यातील दर्जेदार खेळाडू घडतात. पिंपोडे जिमखाना असोसिएशन विविध खेळांच्या स्पर्धा भरवून खेळाडूंना हे व्यासपीठ देण्याचे मोलाचे काम करत आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी केले.
पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील पिंपोडे जिमखाना असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय ‘पिंपोडे प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे नववे पर्व नुकतेच प्रचंड उत्साहात संपन्न झाले. या स्पर्धेच्या भव्य उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेणाऱ्या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ३२ बलाढ्य संघांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सनराईज अकॅडमी लोणंद या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदाचा बहुमान पटकावला. तर गतविजेत्या नागेश्वर क्रिकेट क्लब बावडा या संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपोडे बुद्रुक संघाने तृतीय आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब निगडी संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवल्याबद्दल भानुदास शेळके, साहिल पवार, हणमंत शेळके व विकी बंडलकर या खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला.
उत्कृष्ट समालोचन आणि नेटके नियोजन ही या स्पर्धेची मुख्य वैशिष्ट्ये ठरली. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण (YouTube Live) करण्यात आले होते. सामन्यांचे समालोचन सतीश भोसले, अमित वाघाबरे व सचिन लेंभे यांनी केले, तर पंच म्हणून दिगंबर निकम, सचिन लेंभे, अक्षय लेंभे, चैतन्य येळे, अमोल कांबळे आणि अभि लेंभे यांनी चोख जबाबदारी पार पाडली. क्रिकेट स्पर्धेसोबतच या सोहळ्यात विविध शासकीय पदांवर निवड झालेले अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय-राज्यस्तरीय खेळाडू तसेच १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्याला वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीलकुमार भोसले, तालुका क्रीडा अधिकारी स्नेहल शेळके, पं.स.सदस्या रूपालीताई साळुंखे, महिला व बालकल्याण सभापती पद्मा जाधव, नगरसेवक सुशांत महाजन, सरपंच दीपिका लेंभे, सरपंच नारायण सावंत, उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सचिन लेंभे उपस्थित होते. तसेच करंजखोप हायस्कूलचे ग्रंथपाल मनोज लेंभे (सर), विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाजीराव लेंभे, प्रितम कदम, ऍड. किशोर खराडे, संजय लेंभे, रामभाऊ दगडे, जिमखाना असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कदम, सचिन लेंभे, रणजीत लेंभे, दिगंबर निकम, उत्तम शिंदे, दत्तात्रय पवार यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन लेंभे (सर) यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप कदम, सचिन लेंभे, दिगंबर निकम, रणजित लेंभे, अभिजीत लेंभे, अमोल निकम, अमोल कांबळे, तानाजी जगदाळे, उत्तम शिंदे, दत्तात्रय पवार, राजेंद्र दगडे, मोहन नाचण तसेच पिंपोडे बुद्रुक येथील आजी-माजी खेळाडूंनी व क्रीडाप्रेमींनी विशेष परिश्रम घेतले.
Upstock Demat Account ओपन करा आणि सुरक्षित गुंतवणूक करा येथे क्लिक करा














