Ganesh Chaturthi 2026 : १४ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी; जाणून घ्या घरगुती गणपती प्रतिष्ठापनेचे महत्त्व, शास्त्रोक्त पद्धत आणि शुभ मुहूर्त!

महाराष्ट्र वन न्यूज | विशेष प्रतिनिधी
Ganesh Chaturthi 2026 : उद्या, सोमवार दिनांक १४ सप्टेंबर २०२६ (भाद्रपद शुद्ध चतुर्थी) रोजी देशभरात आणि घरोघरी विघ्नहर्त्या श्री गणरायाचे अत्यंत उत्साहात आगमन होत आहे. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव (मातीच्या) गणपतीची स्थापना करून तिची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. या दिवशी श्री गणेशाचे तत्त्व पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात कार्यरत असते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
पार्थिव गणेश पूजनाचे महत्त्व
शास्त्रानुसार भाद्रपद चतुर्थीलाGanesh Chaturthi 2026 मातीपासून बनवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून पूजन केले जाते. श्री गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि विघ्ननाशक देवता मानले जातात. घरोघरी गणपतीची स्थापना केल्याने वास्तुदोष दूर होतात, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन औदार्य, मंगलमय वातावरण आणि समृद्धी नांदते, असा भाविकांचा दृढ विश्वास आहे.
गणपती प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थीच्या Ganesh Chaturthi 2026 दिवशी मध्यान्ह काळात (दुपारी) श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करणे सर्वाधिक श्रेष्ठ आणि शास्त्रसंमत मानले जाते. सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी प्राणप्रतिष्ठापनेचा मुख्य शुभ मुहूर्त सकाळी ११:१० ते दुपारी ०१:३८ या कालावधीत असणार असून या वेळेत पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. तसेच ज्यांना सकाळीच स्थापना करायची आहे, त्यांच्यासाठी सकाळी ०६:१५ ते ०७:४६ (अमृत) आणि ०९:१८ ते १०:४९ (शुभ) हे चौघडिया मुहूर्त उपयुक्त ठरतील.
घरगुती गणपती प्रतिष्ठापना: शास्त्रोक्त पद्धत
सर्वप्रथम घराचा ईशान्य (उत्तर-पूर्व) किंवा पूर्व कोपरा स्वच्छ करून त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. गणेशमूर्ती आणताना किंवा पाटावर ठेवताना तिचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पाटावर थोडे तांदूळ (अक्षता) ठेवून त्यावर श्री गणेशाची मूर्ती विराजमान करावी. पूजेला बसताना आचमन करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी श्री गणेश पूजन करत असल्याचा संकल्प सोडावा.
त्यानंतर दूर्वा, तांब्या आणि पाण्याने ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करत मूर्तीवर प्रोक्षण करून प्राणप्रतिष्ठापना करावी. गणरायाला चंदन, हळद-कुंकू, अबोली-झेंडूची फुले वाहावीत तसेच २१ दूर्वांची जुडी अर्पण करावी. शक्य असल्यास शमीचे पान आणि लाल मंदाराचे फूल वाहावे. पूजा संपन्न झाल्यावर २१ मोदकांचा (उकडीचे मोदक श्रेष्ठ) नैवेद्य दाखवून त्यावर दूर्वा ठेवावी. शेवटी धूप, दीप लावून आरती करावी आणि मंत्रपुष्पांजली देऊन सर्वांना प्रसादाचे वाटप करावे.












