Kas Pathar Satara जागतिक वारसा स्थळ कास पुष्पपठारावर रंगीबेरंगी फुलांचा बहर; जाणून घ्या Tourism, Best Time To Visit आणि Online Booking ची सोपी पद्धत

विशेष लेख | प्रा. सूर्यकांत अदाटे (देऊर)
Kas Pathar Satara महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम डोंगररांगा म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीच्या या रांगात निसर्गाने भरभरून दिलेला नैसर्गिक खजिनाच सातारा जिल्ह्याला बहाल केला आहे. अशा या सातारा जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. कास, भांबवली, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, पाटण हा सर्वच परिसर सदाहरित जंगलाने व्यापलेला आहे. याच पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात कोयनेचा शिवसागर जलाशय, भांबवली वजराई धबधबा, कास पुष्पपठार तसेच प्रतापगड, वासोटा यासारखे गडकिल्ले आहेत. या सदाहरित जंगलामध्ये पर्यटक अस्सल जैवविविधतेचा अनुभव घेतात. कासचे पुष्पपठार, चाळकेवाडी पवनचक्की पठार, पाचगणीचे टेबललँड या परिसरात आहेत. Kas Plateau कास पुष्पपठाराने सातारा जिल्ह्याला जागतिक पटलावर पोहोचविलेले आहे.
कास पठार केवळ निसर्गसौंदर्यासाठीच नव्हे, तर पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. पश्चिम घाटाचा एक अविभाज्य भाग म्हणून ओळखले जाणारे हे Kas Pathar Satara त्याच्या दुर्मिळ वनस्पती आणि वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक अधिवासामुळे संरक्षित करण्यात आले आहे. यापैकी कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे २५ किमीवर आहे. कास पठाराला जाताना नागमोडी वळणे आणि घाट संपताच विस्तीर्ण असे कास पठार डोळ्यात भरते. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्पपठाराला फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभली आहे.
UNESCO World Heritage Site आणि समृद्ध Biodiversity
पावसाळा सुरू झाल्यावर या पठारावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्रजाती सापडल्याने याचा २०१२ साली युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला. त्यामुळे आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख सातासमुद्रापार झालेली आहे. कास पुष्पपठाराचे नैसर्गिक आणि निसर्गदत्त देणगीची जोपासना करून या पठाराचा विकास करण्यात वनविभागाने पुढाकार घेतला आहे. कास पुष्पपठाराची जैवविविधता जोपासून ती वाढविण्यासाठी शासनाबरोबरच पर्यावरणप्रेमी आणि संस्थांचा मोठा वाटा आहे.
जैवविविधतेचा हॉटस्पॉट असणारे कास पठार ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये फुलणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या सड्यावर गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात. याठिकाणी आजूबाजूच्या गावांतील पाळीव जनावरे मनसोक्तपणे चरतात. कुंपण नसल्याने वन्यजीव मनसोक्त विहार करतात. त्यामुळे निसर्गाचे जीवनचक्र सुरू राहून गवताला व फुलांना शेणखत व मूत्रखत मिळते. त्यामुळे येथील गवत व फुले जोमाने वाढतात.
अनेक रंगांच्या छटांचे नयनरम्य पुष्पवैभव
निसर्गाचा हा विविधरंगी सोहळा ऑगस्टमध्ये सुरू होऊन सप्टेंबरपर्यंत चालतो. या पठारावर बोचरा वारा, पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुके आणि हिरव्यागार विविध रंगाच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्पपठार परिसर जणू धरतीवरचाच स्वर्ग असल्याचा भास येथे येणाऱ्या प्रत्येकालाच होतो.
समुद्रसपाटीपासून १२१३ मीटर उंचीवर आणि १० चौ.किमी क्षेत्रफळ असणाऱ्या या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. त्यात मोठी सोनकी, वायतुरा, पांढरा सापकांदा, सोमाडा, कंदील पुष्प, मुसळी, आभाळी, भारंगी, डुक्करकंद, दीपकडी, दवबिंदू, गवती दवबिंदू, कासा, टूथब्रश ऑर्किड, छावर, उंद्री, अंजनी, अबोलिमा, नीलिमा, कुमुदिनी, निसुर्डी, काळी निसुर्डी, पिंड, पानेर, छोटी सोनकी, सोनकी, कवळा, कोंडल, सीतेची आसवे, हालुंडा, काटे रिंगणी यांचा समावेश होतो. या पठारावर हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग आठ-पंधरा दिवसांनी बदलतो. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव डोळ्यांचे पारणे फेडते.
त्याचबरोबर कास पठारावर विंचवी, दुधली, रान भेंडी, मॉर्निंग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, लाल-पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदाणी, गुलाब बाभूळ, केरळ, मोहरी, श्वेत दुपारी, कासिया, दुरंगी अतिबाला, जवस, रान-काळे तीळ, धामण, सुपारी फूल, अबोली, अंबाडी, काटे-कोरंटी, समुद्रवेल, मोतीचंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णू क्रांती, पान लवंग आदी ७० प्रकारची फुलझाडे आहेत. कास पुष्पपठारावर कीटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या ३२ प्रजाती आढळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १९ प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या १० प्रजाती आणि पक्षांच्या ३० प्रजाती येथे आढळून येतात.
कुमुदिनी तलाव आणि निसर्गाचे अद्भुत सौंदर्य
श्रावणात निळी सीतेची आसवे आणि लाल रंगाची तेरड्याची फुले, मध्ये-मध्ये पांढऱ्या गेंदांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुललेले दिसतात. हे नयनरम्य दृश्य पाहताना प्रत्येकाचे मन हेलावून जाते. या फुलांचा बहर कमी होईपर्यंत पांढरे तुरेवाली आमरी वर येते. मोठ्या तळ्यामध्ये पांढरी छोटी-छोटी कुमुदिनीची कमळे संपूर्ण तलाव झाकून टाकतात. या पठारावर कंदी पुष्पांचे विविध प्रकार निसुर्डी, अबोलिमा, ब्युगोनिया, दीपकांडी, चवर, गौरीहार, रानहळद, आभाळी, नभाळी, हत्तीची सोंड, सापकांदा, नागफणी, शेषगिरी, ड्रॉसेरा इत्यादी नाना प्रकारची फुले उगवतात.
पठारावर कधी लाल-पिवळ्या गौरीहराचे दर्शन तर कधी लाल तेरड्याचे, पिवळ्या सोनकीच्या फुलांचा बहर तर सर्वत्रच, पण मध्येच रानतुळशीच्या निळ्या-जांभळ्या मंजिऱ्या लक्ष वेधतात. कारवी जेव्हा फुलते तेव्हा सर्वत्र तिचेच साम्राज्य जाणवते. लाल-जांभळा रानपावटा किंवा हत्तीची सोंड मनाला आकर्षून घेते. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल असून ते सज्जनगड आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. तलावाच्या जवळच भांबवली वजराई धबधबा आहे. कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे. ‘एबीपी माझा’ ने महाराष्ट्रातून सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रद्वारे सात आश्चर्य निवडली, त्यात कास पठाराचा समावेश आहे.
ऐतिहासिक कास तलाव आणि पर्यटन
कास पठाराच्या जवळच दक्षिण टोकाला कास कृत्रिम तलाव हा १८५५ च्या सुमारास इंग्रजांच्या देखरेखीत बांधला आहे, जो आजूबाजूच्या गावांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. घनदाट जंगल आणि मखमली हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला हा तलाव निसर्ग छायाचित्रण आणि सहलींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. पावसाळ्यानंतर येथे दाट धुके, फुललेली वनश्री आणि नयनरम्य दृश्ये पाहायला मिळतात. तलावाच्या काठावर फेरफटका मारताना शांत वातावरणाचा आणि बोटिंगचा मनसोक्त आनंद घेता येतो. तसेच येथून पश्चिम घाटातील घनदाट जंगलांकडे जाणाऱ्या अनेक ट्रेकिंग मार्गांची सुरुवात होते, त्यामुळे ट्रेकर्ससाठीही एक उत्तम ठिकाण ठरते.
पर्यटकांसाठी सूचना आणि संवर्धनाची गरज
कास पठार हे जैवविविधतेने समृद्ध आणि नैसर्गिक परिसंस्था असलेले ठिकाण असल्यामुळे पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा ठेवली जाते. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करूनच यावे. पावसाळ्यात येथील वाटा निसरड्या होत असल्याने स्लिप-रेझिस्टंट बूट वापरावेत. येथील निसर्गसौंदर्य टिकवण्यासाठी शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळावा. कास पठार परिसर हा नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल ठेवा असल्याने हा ठेवा जतन करण्याची आपली जबाबदारी आहे. पावसाळ्यात येथे संततधार पाऊस असल्याने छत्री, रेनकोट किंवा जॅकेट सोबत ठेवावे. योग्य तयारी आणि जबाबदारीने वागल्यास कास पठाराचा निसर्गरम्य अनुभव अविस्मरणीय ठरेल!
कासला हॉटस्पॉट बनविल्याने अलीकडे येथे मानवी हस्तक्षेप वाढला आहे. पर्यटक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याने या ठिकाणच्या प्रदूषणात, प्लास्टिक कचरा वाढलेला आहे. अलीकडे शुल्कवाढ केल्याने पर्यटकांच्यामध्ये नाराजी आहे. त्याबरोबरच अलीकडील माहितीनुसार कास पठाराच्या परिसरात यवतेश्वर-कास मार्गावर ९६ अवैध बांधकामे आहेत. ही अवैध बांधकामे कासच्या जैवविविधतेला बाधा आणत असून जनतेने कास पुष्पपठाराच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. जैवविविधतेने समृद्ध, निसर्गसौंदर्याने नटलेले आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असे हे ठिकाण निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि ॲडव्हेंचर प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.
कास परिसरात अनेक पर्यटन स्थळे, येथे आवर्जून भेट द्या
कास पठार पाहून झाल्यावर येथून १५ किमीवरील बामणोली, मिनी काश्मीर तापोळा, ऐतिहासिक अवशेष, रोमांचक वाटा आणि थक्क करणारी निसर्ग दृश्यांचा अनुभव देणारा वनदुर्ग वासोटा किल्ला, सज्जनगड, निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफर्ससाठी हा स्वर्ग असणारा ठोसेघर धबधबा, चाळकेवाडी पवनचक्की पठार, कासाई देवी मंदिर, यवतेश्वर घाट व मंदिर ही ठिकाणे आपण पाहू शकतो.
घाटाई देवी मंदिर परिसरातून समोरच दरीत पडणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते. इथली रंगीबेरंगी जैवविविधता, शांत तलाव, ऐतिहासिक किल्ले आणि साहसाचा प्रत्यय देणारी ठिकाणे तसेच निसर्ग, संस्कृती, इतिहास आणि रोमांच यांचे परिपूर्ण मिश्रण असणारी ही ठिकाणे नक्कीच आपल्याला अविस्मरणीय आनंद देतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात संस्मरणीय अनुभव घेण्यास इच्छुक असलेल्या पर्यटकांसाठी कास पठार हे नक्कीच आदर्श ठिकाण आहे!
— सहा. प्रा. सूर्यकांत शामराव अदाटे
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (मो. ९९७५७५९३२५)












