Police Bharati 2026 Result :जिजाऊच्या कन्येची ऐतिहासिक भरारी! कु. वेदिका पष्टेची एकाच वेळी ३ सरकारी पदांवर मोहोर

Police Bharati 2026 Result :निचोले गावाची लेक बनली महाराष्ट्राची शान!
पालघर / महाराष्ट्र वन प्रतिनिधी
Police Bharati 2026 Result “जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलेही गगनभरारी घेऊ शकतात,” याचा प्रत्यय वाडा तालुक्यातील निचोले गावाने अनुभवला आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या मोफत पोलीस अकॅडेमीची विद्यार्थिनी कु. वेदिका दीपक पष्टे हिने एकाच वेळी तीन ठिकाणी पोलीस दलात निवड होऊन एक नवा इतिहास रचला आहे.
वेदिकाने आपल्या कौशल्याच्या जोरावर खालील तिन्ही विभागात यश संपादन केले आहे मुंबई पोलीस शिपाई, मुंबई कारागृह विभाग व मीरा-भाईंदर पोलीस दल अशा तीन विभागात यशस्वी होत विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. विशेष म्हणजे, निचोले गावातून पोलीस सेवेत रुजू होणारी वेदिका ही पहिलीच कन्या ठरली आहे. तिच्या या यशाने केवळ पष्टे कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण वाडा तालुक्याचा गौरव वाढला आहे.
या ऐतिहासिक यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ८ मे २०२६ रोजी निचोले गावात भव्य विजय रॅली काढण्यात आली. हनुमान मंदिर ते वेदिकाच्या निवासस्थानापर्यंत निघालेल्या या रॅलीत ग्रामस्थ, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गाव न्हाऊन निघाले होते.
या कार्यक्रमाला जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी विशेष उपस्थिती लावली. “ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलांचे पोलीस होण्याचे स्वप्न केवळ जिजाऊच्या मोफत प्रशिक्षण केंद्रामुळेच पूर्ण होत आहे,” अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. निलेश सांबरे यांनी उभ्या केलेल्या या हक्काच्या व्यासपीठामुळे आज हजारो हातांना रोजगार मिळत आहे.
वेदिकाचे हे यश आजच्या तरुणाईसाठी खूप मोठे उदाहरण आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जर तुम्हाला जिजाऊ मोफत पोलीस अकॅडेमी सारख्या संस्थेची साथ मिळाली, तर तुम्हीही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. वेदिकाच्या यशाने सामाजिक कार्य सार्थकी लागल्याचे निलेश सांबरे यांनी सांगितले.












