Manikrao Kokate
सर्व खाती अजित पवारांकडे वर्ग
Manikrao Kokate News मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून नाशिकमधील १९९५ सालातील एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणी अटक वॉरंटमुळे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खाती काढून घेण्यात आली आहेत यामुळे वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला असून सदनिका घोटाळा प्रकरण त्यांना भोवले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार कोकाटेंच्याकडील खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बॅकफूट गेला आहे.
कोकाटेंवरील अडचणी वाढण्यामागे नाशिकमधील १९९५ सालातील एका जुन्या सदनिका घोटाळा प्रकरणाचा मोठा वाटा आहे. या प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.
दरम्यान, नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून कोकाटेंच्या अटकेसाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे कोकाटे यांच्यावरील कायदेशीर अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राजकीय दबाव वाढत गेल्यानंतर अखेर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, न्यायालयीन निर्णय आणि अटक वॉरंटमुळे सरकारवर टीकेचा भडिमार होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
कोकाटेंचा राजीनामा बाबतच्या वृत्ताला स्पुष्टी मिळत नसली तरी त्यांच्याकडील सर्व खाती काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खात्यांची पुनर्रचना केली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागांचा कार्यभार आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे अजित पवार यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी आली आहे.
राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत “न्यायालयीन आदेशानंतरच सरकारला जाग आली” असा आरोप केला आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून “न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप न करता योग्य निर्णय घेण्यात आला” असे स्पष्टीकरण दिले जात आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय जरी झाला नसला तरी त्यांच्या अटक आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा पुढील टप्पा काय असेल, कोकाटेंना अटक होणार का, आणि या प्रकरणाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Manikrao Kokate resignation, माणिकराव कोकाटे अटक वॉरंट, कोकाटे सदनिका घोटाळा, अजित पवार खाते, Devendra Fadnavis Maharashtra, Nashik court warrant, Maharashtra political crisis, राष्ट्रवादी काँग्रेस बातमी, कोकाटे प्रकरण, महाराष्ट्र राजकारण
हे पण वाचा मोठी राजकीय हालचाल; महापालिका निवडणुकीसाठी पवार काका-पुतण्या एकत्र येण्याचे संकेत







