Republic of Balochistan: पाकिस्तानचे होणार तुकडे? बलूचिस्तान स्वतंत्र घोषित; ८५% भूभागावर बलूच सैन्याचा ताबा, नव्या चलनासह राष्ट्रगीतही जारी!

नवी दिल्ली/डेस्क
आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानसाठी अत्यंत धक्कादायक आणि त्यांच्या अखंडतेलाच सुरुंग लावणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. बलूच नेते मीर यार यांनी ‘द रिपब्लिक ऑफ बलूचिस्तान’ Republic of Balochistan या नव्या स्वतंत्र देशाची अधिकृत घोषणा केली आहे. बलूचिस्तानच्या सुरक्षा आणि संरक्षण दलांनी या प्रांतातील तब्बल ८५% भूभागावर आपले पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केल्याचा ऐतिहासिक दावा केला असून, या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे पाकिस्तानच्या लष्कराला आणि सरकारला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
नवे राष्ट्रगीत, ध्वज आणि स्वतःचे चलनही बाजारात
बलूच नेते मीर यार यांनी सोशल मीडियाद्वारे जारी केलेल्या अधिकृत पत्रकात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या नवीन घोषणेनुसार बलूचिस्तानने आता स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र घोषित केले असून, देशाचा नवीन राष्ट्रीय ध्वज देखील फडकवला आहे. या नवीन देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून “मा चुकाईन बलूचानी” हे गीत स्वीकारण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानच्या चलनावर विसंबून न राहता, आर्थिक व्यवहारांसाठी त्यांनी ‘बलूची फालुस’ हे स्वतःचे नवीन चलन देखील अधिकृतपणे बाजारात आणले आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीवर बलूच सुरक्षा दलांचे वर्चस्व
बलूचिस्तान हा नैसर्गिक साधनसंपत्तीने अत्यंत समृद्ध असलेला प्रदेश मानला जातो. मीर यार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर बलूचिस्तानमधील सर्व प्रमुख सोन्याच्या आणि तांब्याच्या खाणींवर बलूच सुरक्षा दलांनी पूर्ण ताबा मिळवला आहे. यासोबतच राज्यातील १५० पेक्षा जास्त कार्यरत नैसर्गिक गॅस क्षेत्रे आणि १,२०० हून अधिक कोळशाच्या खाणी आता पाकिस्तानच्या ताब्यातून सुटून पूर्णपणे बलूच सैन्याच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत, ज्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे आर्थिक पातळीवरही मोडले आहे.
५ लाख सैनिकांसह पाकिस्तानला हुसकावून लावणार
आपल्या सैन्याकडे सध्या लढाऊ विमाने, रणगाडे, मिसाईल्स किंवा जड तोफखाना यांसारखी अत्याधुनिक शस्त्रे नसली, तरी आमच्या मातृभूमीच्या जमिनीवर आमचे पूर्ण नियंत्रण आहे, असा ठाम विश्वास मीर यार यांनी व्यक्त केला आहे. सध्या बलूचिस्तानचे लष्कर, नौदल, वायुसेना आणि नागरी प्रशासन मिळून तब्बल ५ लाख सैनिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे बलाढ्य दल सज्ज झाले आहे. या सैन्याच्या बळावर २०२६ च्या अखेरपर्यंत पाकिस्तानच्या उरलेल्या लष्कराला Republic of Balochistan च्या सीमेबाहेर हाकलून दिले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या लष्कर, पोलीस आणि फ्रंटियर कॉर्प्समधून मोठ्या प्रमाणावर बलूच आणि पठाण जवानांनी सामूहिक राजीनामे देऊन बलूच स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली आहे.
पाकिस्तान सरकार आणि लष्कराचे पूर्ण मौन
बलूच नेते मीर यार यांनी ‘द रिपब्लिक ऑफ बलूचिस्तान’ Republic of Balochistan च्या स्वातंत्र्याची केलेली घोषणा आणि ८५% भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. मात्र, इतकी मोठी घडामोड घडल्यानंतरही पाकिस्तान सरकार, तिथले लष्कर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी सुरू आहेत, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या दाव्याबाबत पाकिस्तानकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, आंतरराष्ट्रीय समुदायाची यावर नेमकी काय भूमिका आहे, याविषयीची अधिकृत माहिती आता समोर आलेली नाही.
आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रतिसाद: अद्याप कोणाचीही मान्यता नाही
मीर यार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारत, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रांकडे (UN) बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याची मागणी केली आहे. मात्र, अधिकृत सूत्रांनुसार, अद्याप जगातील कोणत्याही देशाने बलूचिस्तानच्या या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही. संयुक्त राष्ट्रांकडे अद्याप अशा कोणत्याही नवीन देशाच्या सदस्यत्वाचा प्रस्ताव अधिकृतपणे सादर झालेला नाही किंवा त्याला मंजुरी मिळालेली नाही. कोणत्याही नव्या देशाला अस्तित्वात येण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इतर देशांची राजनैतिक मान्यता आवश्यक असते, मात्र सध्या ‘द रिपब्लिक ऑफ बलूचिस्तान’ Republic of Balochistan ला अशी कोणतीही राजनैतिक मान्यता मिळालेली नाही











