LPG Price Hike 2026 :युद्ध आखातात आणि झळ भारतात- आता दोन सिलिंडरमध्ये २५ दिवसांचे अंतर;

गॅस दरवाढीचा मोठा भडका: घरगुती आणि व्यावसायिक गॅस महागला!
नवी दिल्ली: LPG Price Hike 2026 मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठा साखळी विस्कळित झाली असून, त्याचे गंभीर परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर दिसू लागले आहेत. इंधनाचा संभाव्य तुटवडा आणि साठेबाजी रोखण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांत अत्यंत महत्त्वाचा बदल केला असून, दोन सिलिंडर बुकिंगमधील कालावधी पुन्हा एकदा वाढवला आहे. त्यामुळे आधी दरात वाढ आता बुकिंगमधील दिवसात वाढ यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
बुकिंग कालावधीत वाढ आणि साठेबाजीला चाप
सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आता घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगमधील अंतर १५ दिवसांवरून थेट २५ दिवस करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वी हा कालावधी २१ दिवस करण्यात आला होता, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता पाहता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, ग्राहकांना आता दोन सिलिंडर बुक करण्याच्या दरम्यान किमान २४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही महिन्याच्या १ तारखेला सिलिंडर बुक केला असेल, तर पुढील सिलिंडरसाठी तुम्हाला २५ तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल. या निर्णयामागे मुख्यत्वे गॅसचा काळाबाजार आणि भीतीपोटी होणारी साठेबाजी (Panic Booking) रोखणे हा उद्देश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारने देशात सध्या गॅस किंवा इंधनाचा कोणताही मोठा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून हे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, मोठ्या कुटुंबांसाठी किंवा ज्यांचा गॅस वापर जास्त आहे, अशा सर्वसामान्यांसाठी हा निर्णय मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
किंमतीत मोठी वाढ आणि घरगुती बजेटवर ताण
केवळ बुकिंगच्या नियमांतच नाही, तर गॅसच्या दरातही मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ७ मार्च २०२६ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकृत माहितीनुसार, दिल्लीत जो सिलिंडर ८५३ रुपयांना मिळत होता, तो आता ९१३ रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत घरगुती गॅससाठी ९१२.५० रुपये मोजावे लागत आहेत, तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे ९३९ आणि ९२८.५० रुपयांपर्यंत गेले आहेत. मात्र उज्वला योजनेतील दरात वाढ नाही झाली.
व्यावसायिक सिलिंडर महागले; हॉटेल व्यवसाय संकटात
घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक क्षेत्रातही महागाईचा भडका उडाला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत ११४.५ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १,८८३ रुपयांवर पोहोचली आहे. या दरवाढीमुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता असून, छोटे व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत.
ऊर्जा सुरक्षेसाठी ‘नॅचरल गॅस नियमन’ लागू
जागतिक स्तरावर ‘स्ट्रेथ ऑफ हॉर्मुझ’ या समुद्री मार्गावर युद्धाचे सावट असल्याने भारताच्या गॅस आयातीवर परिणाम झाला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने ‘नैसर्गिक वायू पुरवठा नियमन २०२६’ अंतर्गत घरगुती वापराला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. औद्योगिक क्षेत्रातील गॅस पुरवठ्यात कपात करून तो कोटा घरगुती वापरासाठी वळवला जात आहे, जेणेकरून टंचाई भासू नये. मात्र, वाढत्या किंमती आणि कडक नियमांमुळे २०२६ वर्षाची सुरुवात सर्वसामान्यांसाठी महागाईची ठरत आहे.











