DK Shivakumar Karnataka CM :कर्नाटकात आता ‘डीके पर्व’! काँग्रेसचे ‘संकटमोचक’ डी. के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बेंगळुरू: कर्नाटकच्या राजकारणात आज एक मोठा आणि ऐतिहासिक बदल झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे ‘संकटमोचक’ (Troubleshooter) म्हणून देशभरात ओळखले जाणारे DK Shivakumar Karnataka CM डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली आहे. बेंगळुरू येथील ‘लोक भवन’ येथे पार पडलेल्या एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या शपथविधीमुळे कर्नाटकात आता ‘डीके पर्व’ सुरू झाले असून, मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून सत्तेची सूत्रे अधिकृतपणे डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
जी. परमेश्वर बनले उपमुख्यमंत्री; १३ मंत्र्यांचाही शपथविधी
DK Shivakumar यांच्यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच पक्षातील तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांचा मेळ घालत एकूण १३ कॅबिनेट मंत्र्यांनीही आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सुपुत्र यतींद्र सिद्धरामय्या आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र प्रियांक खर्गे यांचाही प्रामुख्याने समावेश आहे.
विद्यार्थ्यापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा ‘पॉवरफुल’ प्रवास
६४ वर्षीय डी. के. शिवकुमार यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. ८ वेळेस आमदार राहिलेल्या शिवकुमार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात एनएसयूआय (NSUI) या विद्यार्थी संघटनेतून केली होती. अत्यंत कठीण काळात त्यांनी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्षपद (KPCC) सांभाळले आणि २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला १३५ जागा जिंकून देत पूर्ण बहुमताची सत्ता मिळवून दिली. काँग्रेस पक्षावर जेव्हा जेव्हा देशभरात राजकीय संकट आले— मग ते २००२ मधील महाराष्ट्रातील विलासराव देशमुख सरकार वाचवणे असो वा २०१७ मधील गुजरातच्या राज्यसभेची निवडणूक असो— डी. के. शिवकुमार यांनी नेहमीच आमदारांची तटबंदी राखत पक्षाला संकटातून बाहेर काढले. याच ‘संकटमोचक’ प्रतिमेमुळे आणि गांधी घराण्याशी असलेल्या एकनिष्ठतेमुळे अखेर त्यांना राज्याचे सर्वोच्च पद मिळाले आहे.
राहुल गांधींसह दिग्गज नेत्यांची मांदियाळी
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, Rahul Gandhi काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्यासह चित्रपट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच विविध मठांचे मठाधीश मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियाद्वारे डी. के. शिवकुमार यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले असून, कर्नाटकच्या जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकार राज्यासोबत मिळून काम करेल, अशी ग्वाही दिली आहे.
लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य (Of the people, for the people, by the people)
माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात मला धीर देणारे, माझ्यात धैर्य भरणारे आणि मला पुढे नेण्यासाठी आपल्या खांद्यावर घेणारे माझे लाडके कर्नाटकचे करोडो नागरिक आणि माझे सहकारी कार्यकर्ते यांच्या आशीर्वादाने, आज मी ‘विधान सौध’ येथे कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या क्षणी, तुमच्या या अथांग प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल मी तुम्हा सर्वांसमोर कृतज्ञतेने नतमस्तक होतो.
आज माझ्या खांद्यावर केवळ मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी नाही, तर करोडो कन्नडिगांची स्वप्ने साकार करण्याचे पवित्र कर्तव्य आहे. मला ही संधी मिळवून देण्यात माझी ताकद बनून पाठीशी उभे राहिलेले सर्व ज्येष्ठ, मार्गदर्शक आणि प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो.
आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात, आपल्याला नवीन विचारांसह आपल्या अभिमानास्पद कर्नाटकला विकासाच्या शिखरावर न्यायचे आहे. या सर्वांगीण प्रगतीच्या मार्गावर शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण आणि प्रत्येक नागरिकाचा सहभाग आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
कोणतीही एकटी व्यक्ती बदल घडवून आणू शकत नाही, पण जर आपण सर्वांनी हातमिळवणी केली, तर काहीही अशक्य नाही. या, आपण सर्व मिळून एक सुंदर, समृद्ध आणि पुरोगामी कर्नाटक घडवूया, ज्याचा आपल्या भावी पिढ्यांना सार्थ अभिमान वाटेल. असा शब्दात मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार DK Shivakumar यांनी एक्स वर सर्वांचे आभार मानले.










