Gopalkala festival 2026 उद्या देऊरमध्ये रंगणार पुरातन गोपाळकाला उत्सव, ग्रामस्थांनी वर्षानुवर्षानूची जपलीय परंपरा

कोरेगाव / महाराष्ट्र वन वृत्तसंस्था
Gopalkala festival 2026 आमचा विठोबा टिपऱ्या खेळ, सोन्याचं जानवं भुईवर लोळं असा पारंपरिक भारुडातून प्रत्यक्ष बालकृष्णाला खेळात आमंत्रित करत भाविक देऊरची ओळख असलेली गोपाळकाल्याची पुरातन परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपणार आहेत. उद्या बुधवारी हा उत्सव होणार असून यासाठी भागातून भाविक गर्दी करतात.
दरवर्षी आषाढी एकादशीनंतर देऊरच्या पुरातन विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात गोपाळकाला उत्सव साजरा केला जातो. येथील विठ्ठल मंदिर हे पुरातन असून वास्तुशिल्पाचे अजोड उदाहरण आहे, त्यामुळे या मंदिरास ‘प्रतिपंढरपूर’ असेही म्हटले जाते. सालाबादप्रमाणे या वर्षीही या मंदिराच्या प्रांगणात गोपाळकाला उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात येणार आहे.
उद्या ज्ञानबा-तुकारामाच्या जयघोषात गावातून दिंडी काढली जाईल. दिंडी विठ्ठल मंदिरांनजीक आल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घातली जाईल. त्यानंतर मंदिरासमोरील प्रांगणात काल्याला सुरुवात होणार आहे. यावेळी वारकरी विविध खेळ खेळतील. यामध्ये ‘चला गं सया वारुळाला जावू’ अशा लोकगीतावर ठेका धरत नागोबाचा खेळ रंगेल. त्यानंतर ‘आमचा विठोबा टिपऱ्या खेळ, सोन्याचं जानवं भुईवर लोळ’च्या तालावर टिपऱ्यांचा डाव रंगणार आहे.
याचबरोबर सागरगोट्या, हमामा व लेझीमच्या पारंपरिक खेळांनी गोपाळकाला अधिक बहरात येईल. दरम्यान, एकनाथी भारुडातील ‘सोंग’ हे या गोपाळकाल्याचे मुख्य वैशिष्ट्य असून अनेक भाविक सोंग काढून विविध विषयांवर समाजप्रबोधन करत भाविकांची करमणूक करतील. काल्याची दहीहंडी फोडून सोहळ्याची सांगता केली जाईल.
‘करंडी’ वाद्याच्या तालावर गायले जाणार अभंग!
देऊरच्या गोपाळकाल्याला मोठी पुरातन परंपरा असून यामध्ये काल्याचे अभंग हे ‘करंडी’ नावाच्या अनोख्या वाद्याच्या तालावर गायले जातात. करंडीचे अभंग हे या सोहळ्याचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य असून, हे वाद्य व अभंग दुर्मिळ होत चालले आहेत; त्यामुळे त्यांची योग्य जपणूक व्हावी, अशी आशा भाविकांनी व्यक्त केली आहे.
यंदा सोंगासाठी प्रोत्साहनपर बक्षिसे
हा सोहळा संपूर्ण राज्यात वैशिष्ठपूर्ण व पुरातन आहे, यामाध्यमातून हरवत चाललेल्या सागरगोट्या, हमामा व लेझीमच्या, टिपरी पारंपरिक खेळांखेळांना जपलं जाते तसेच यामध्ये एकनाथी भारुडातील ‘सोंग’ हे या गोपाळकाल्याचे मुख्य वैशिष्ट्य असून अनेक भाविक सोंग काढून विविध विषयांवर समाजप्रबोधन करत भाविकांची करमणूक करतात याना प्रोत्साहन मिळावे व सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावा यासाठी म्ह्णून यंदा महाराष्ट्र राज्य साप्ताहिक संघटना, सातारा समाचार यांचे वतीने विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवली आहेत.











