सह्याद्रीच्या रक्षणासाठी एल्गार! ३० नोव्हेंबरपासून ‘पारगड ते रायगड जागरण यात्रा’; पंप स्टोरेज आणि शक्तिपीठ महामार्गाला पर्यावरणप्रेमींचा विरोध save sahyadri pargad to raigad jagran yatra

कोल्हापूर/प्रतिनिधी
save sahyadri pargad to raigad jagran yatra पश्चिम घाट अर्थात सह्याद्री पर्वतरांगातील समृद्ध पर्यावरण आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी ‘सह्याद्रीच्या रक्षणासाठी – पारगड ते रायगड जागरण यात्रा’ या व्यापक जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, निसर्गप्रेमी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मोहिमेचे निमंत्रक कॉ. संपत देसाई आणि राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.
पंप स्टोरेज प्रकल्प आणि शक्तिपीठ महामार्गामुळे जंगलांना धोका
दक्षिण भारताचा प्रमुख जलस्रोत आणि दुर्मिळ पशुपक्षी व वनस्पतींचा अधिवास असलेल्या सह्याद्रीच्या अस्तित्वावर सध्या संकट ओढवले आहे. प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्प आणि शक्तिपीठ महामार्ग यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे येथील जैवविविधता व मानवी जीवन धोक्यात आले असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. भीमाशंकर आणि तारळी पाठोपाठ आता कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ पंप स्टोरेज प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे सुमारे दीड ते दोन हजार हेक्टर समृद्ध जंगल नष्ट होण्याची गंभीर भीती व्यक्त केली जात आहे. याविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘पारगड ते पन्हाळगड’ असा या यात्रेचा पहिला टप्पा पार पडणार आहे.
असा असेल तीन दिवसीय जागरण यात्रेचा मार्ग
पहिल्या टप्प्यातील या यात्रेची सुरुवात पहिल्या दिवशी (३० नोव्हेंबर) सकाळी १० वाजता चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड येथून होईल. त्यानंतर हेरे मार्गे चंदगड येथे सभा, धामापूर-कुरणी येथे सभा व भोजन होऊन आजरा येथे मुक्काम व जाहीर सभा होणार आहे. दुसऱ्या दिवशी (१ डिसेंबर) ही यात्रा पेरणोली, देवकांडगाव, पाटगाव, कडगाव मार्गे शेळोली व मडुरहून गारगोटी येथे पोहोचेल, जिथे विविध ठिकाणी जनजागृती सभा घेतल्या जातील. तिसऱ्या दिवशी (२ डिसेंबर) मुदाळ तिठा, सरवडे, शिरगाव, राशिवडे व सडोली मार्गे ही यात्रा पन्हाळगड येथे दाखल होईल आणि सायंकाळी ५ वाजता पन्हाळा येथे पहिल्या टप्प्याची सांगता सभा पार पडेल.
दिग्गज नेते, साहित्यिक आणि पर्यावरणप्रेमींचा सहभाग
या जागरण यात्रेत आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, कृष्णात खोत, कॉ. उदय नारकर, कॉ. सुभाष लांडे, श्रीपाद धर्माधिकारी यांच्यासह राज्यभरातील अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, लेखक, कवी आणि पर्यावरण अभ्यासक सहभागी होणार आहेत. सह्याद्री वाचवण्याच्या या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











