Satara Breaking News : दुष्काळाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; बिजवडीत मेंढ्यांसह रास्ता रोको; शशिकांत शिंदे यांचा सरकारला थेट इशारा

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जनावरांसह प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक देणार
कोरेगाव : Satara Breaking News दुष्काळ निवारणाच्या सरकारी घोषणा एकीकडे आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती दुसरीकडे, अशा विरोधाभासी चित्रात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघातच चारा छावण्या व चारा डेपो सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना सोमवारी थेट आक्रमक होत रस्त्यावर उतरावे लागले. दहिवडी फलटण महामार्गावर बिजवडी येथे सकाळी दहा वाजल्यापासून मेंढ्यांसह रास्ता रोको आंदोलन सुरू करत शेतकरी व पशुपालकांनी शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांवर संताप व्यक्त केला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारच्या दुष्काळी धोरणांवर जोरदार प्रहार करत, केवळ कागदावरच्या घोषणा नकोत, तर दुष्काळग्रस्तांच्या बांधावर प्रत्यक्ष मदत पोहोचवा, असा आक्रमक इशारा दिला.या आंदोलनात नवनिर्वाचित आमदार हर्षदा जाधव देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माण तालुक्यातील बिजवडी व परिसराला अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदा दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढल्याने पशुधन जगविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. चारा उपलब्ध नाही, पाणीटंचाई कायम आहे, पशुधनाच्या संगोपनाचा खर्च वाढला आहे, मात्र शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजना प्रत्यक्षात पोहोचत नसल्याने शेतकरी कुटुंबे हतबल झाली आहेत. या असहाय परिस्थितीत शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आंदोलनस्थळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी शासनाच्या घोषणांचा समाचार घेतला. अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन राज्य सरकारने दुष्काळाची तीव्रता गांभीर्याने घेतल्याचे सांगितले आणि विविध उपाययोजनाही जाहीर केल्या, मात्र त्या प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे बिजवडीतील आंदोलनातून स्पष्ट होत आहे, अशी टीका त्यांनी केली.
जिल्ह्यात २०० दिवसांचा चारा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, मग तो चारा नेमका कुठे आहे? दुष्काळग्रस्त जनावरांना तो मिळतोय का? जनावरांच्या पिण्यासाठी ४० लिटर आणि माणसांना पिण्यासाठी २० लिटर पाण्याची व्यवस्था सांगितली जात असताना प्रत्यक्षात टँकर कुठे आहेत? शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची हौस आहे का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी शासनाच्या दुष्काळी व्यवस्थापनातील विसंगतीवर बोट ठेवले.
२०१३ चा दुष्काळ आपण पाहिला आहे. त्या काळात शासन आणि कृषी विभागाने चाऱ्याची उपलब्धता कशी करून दिली होती, याचीही आपल्याला माहिती आहे. मग आज दुष्काळाची तीव्रता असताना त्याच पद्धतीने चाऱ्याची व्यवस्था का होत नाही? दुष्काळी उपाययोजना जाहीर करून आनंद मानण्यापेक्षा त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे शिंदे यांनी ठणकावले. माण तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटविण्यासाठी सोळशी धरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.
कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोयनेतून वीज निर्मितीचे उर्वरित राहणारे पाणी हे मुंबईला देण्याचं जाहीर केलं. कोट्यावधी रुपयांचा हा प्रकल्प आहे. पण ज्या सातारा जिल्ह्यामध्ये कोयना, कण्हेर, उरमोडी, जिहे कठापूर, तारळी, धोम आणि धोम बलकवडी अशी अनेक धरणं दिली. मात्र सातारा जिल्ह्यातला आमचा हा भाग कायम वंचित राहतो, हे खरं आजच्या आंदोलनातलं दुःख आहे. आणि मला वाटतं की गोकुळसारखा निर्णय घेत असताना कायदा वगैरे सगळं बाजूला ठेवून कुठलाही निर्णय सरकारकडून घेतला जातो. मग आपण आमदार असताना सहा टीएमसी क्षमतेच्या धरणाचा विषय पुढे मांडला होता. आता राज्यात सत्ताधाऱ्यांकडे निर्णय घेण्याची ताकद आहे, जिल्ह्यात एक सोडून चार चार मंत्री आहेत, सत्ता तुमच्याकडे आहे, मग अनुशेष आणि अन्य बाबींचा विचार बाजूला ठेवून सोळशी धरणाच्या कामाचे टेंडर तातडीने काढण्याचे धाडस सरकारने दाखवावे, असे थेट आव्हान त्यांनी दिले.
माण तालुक्यातील दुष्काळी भाग कायम पाणी आणि सिंचनापासून वंचित राहतो, ही या भागातील जनतेची वेदना आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प होत असताना दुष्काळी भागाला न्याय मिळत नसेल, तर या विकासाचा उपयोग नेमका कोणासाठी, असा प्रश्नही या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित झाला.
दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आणि शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपये तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. पुढील काळात कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही मदत अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती असल्याचेही त्यांनी व्यक्त केली.
थेट जनावरे घेऊन प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात घुसणार
बिजवडी येथे सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन हे केवळ चारा छावण्यांच्या मागणीपुरते मर्यादित नसून दुष्काळी जनतेच्या जगण्याचा संघर्ष आहे. शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जनावरांसह दहिवडीच्या प्रांताधिकारी कार्यालय आणि सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन आंदोलन केले जाईल. निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. सरकारने दुष्काळग्रस्त जनतेच्या भावना, पशुधनाची होणारी उपासमार आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर जनता उठाव करेल आणि या दुष्काळाचा राजकीय फटका सरकारला बसेल, असा इशारा त्यांनी दिला.











