Delimitation Bill मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चांदरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ८ खासदारांना व्हीप; सुप्रिया सुळेंच्या विधानाने मविआत खळबळ, वडेट्टीवारांचा टोला!

लोकसभेतील सर्व ८ खासदारांना व्हीप जारी; ३० नोव्हेंबरपासून उपस्थित राहण्याचे आदेश
मुंबई / वृत्तसंस्था
Delimitation Bill मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या लोकसभेतील सर्व आठ खासदारांना व्हीप बजावला आहे. संसदेच्या आगामी बैठकांसाठी ३० नोव्हेंबरपासून लोकसभेत अनिवार्यपणे हजर राहण्याचे स्पष्ट आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी हा व्हीप जारी केला असून, लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार असल्याचे नमूद करत सर्व खासदारांनी कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहावे आणि पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, असे निर्देश दिले आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
व्हीपमध्ये काय आहे? संसदेच्या बैठकांचे वेळापत्रक
सोमवार, ३० नोव्हेंबर ते शुक्रवार, ४ डिसेंबर या कालावधीत लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार असल्याने पक्षाच्या सर्व खासदारांनी या संपूर्ण कालावधीत आवर्जून उपस्थित राहावे आणि पक्षाच्या भूमिकेला साथ द्यावी, असे व्हीपमध्ये नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही सभागृहांच्या बैठकांबाबत माहिती दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा व्हीप समोर आला आहे. अत्यावश्यक शासकीय कामकाजासाठी लोकसभेची बैठक सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी आणि राज्यसभेची बैठक बुधवार, २ डिसेंबर रोजी पुन्हा बोलवण्याची विनंती सरकारने अनुक्रमे लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना केल्याचे रिजिजू यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत स्पष्ट केले होते. कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज ३ डिसेंबर रोजी संपण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली होती.
सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने खळबळ; विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसंख्येच्या आधारावर वाढ न करता, प्रत्येक राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संख्येत सरसकट ५० टक्के वाढ होत असेल, तर पक्ष या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, असे सुळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचे पाहायला मिळाले. यावर भाष्य करताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांना मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा द्यायचा असेल, तर त्यांनी खुशाल द्यावा; मात्र त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नाव ओढू नये, असे वडेट्टीवार म्हणाले. काँग्रेसच्या काळात जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना झाली, तेव्हा केवळ राखीव मतदारसंघांमध्ये बदल करण्यात आले होते, मतदारसंघांची संख्या वाढवण्यात आली नव्हती किंवा सोयीसाठी त्यांची विभागणीही करण्यात आली नव्हती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पावसाळी अधिवेशनाचाच विस्तार
संसदेचे हे आगामी कामकाज पावसाळी अधिवेशनाचाच एक भाग किंवा विस्तार मानले जात आहे. १३ ऑगस्ट रोजी संसद अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती आणि अधिवेशनाची औपचारिक सांगता करण्यात आली नव्हती. त्यामुळेच या कामकाजाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.











