Cockroach Janta Party Founder Beaten in Rajasthan: नीट पेपरफुटी आंदोलनात मोठी खळबळ! जयपूरमध्ये CJP’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर भर गर्दीत हल्ला; कानशिलात लगावल्याने प्रचंड राडा, व्हिडिओ व्हायरल

Cockroach Janta Party Founder Beaten in Rajasthan :देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे ‘Cockroach Janta Party’चे संस्थापक अभिजीत दीपके Abhijeet Dipke यांच्यावर राजस्थानच्या जयपूरमध्ये भर आंदोलनात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात गटाकडून झालेल्या या मारहाणीमुळे आंदोलनस्थळी प्रचंड गोंधळ उडाला असून, संतापलेल्या शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी हल्ला करणाऱ्यांना पकडून चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ Abhijeet Dipke यांच्या नेतृत्वात आज राजस्थानमधील जयपूर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तरुणांची आणि विद्यार्थ्यांची प्रचंड मोठी गर्दी जमा झाली होती. आंदोलन पूर्ण जोशात सुरू असताना आणि केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात असताना, एका कार्यकर्त्याने पांढरा शर्ट परिधान केलेल्या अभिजीत दीपके यांना आपल्या खांद्यावर उचलून धरले होते. दीपके भर गर्दीतून आंदोलकांना संबोधित करत पुढे जात असतानाच, गर्दीचा फायदा घेऊन एक अज्ञात जमाव त्यांच्या अगदी जवळ आला. काही समजण्याच्या आतच या जमावातील एका अज्ञात इसमाने थेट अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावली, तर इतर २ ते ३ जणांनी मिळून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली आणि मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र, आपल्या नेत्यावर झालेला हल्ला पाहताच उपस्थित आंदोलक आणि समर्थकांचा संयम सुटला. कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवत अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीला चहूबाजूंनी घेरले. संतापलेल्या आंदोलकांनी हल्ला करणाऱ्या जमावातील काही जणांना पकडून तिथेच रस्त्यावर चांगलाच चोप दिला. या बेदम मारहाणीनंतर स्वतःला सोडवून घेत हल्ला करणारे संशयित आरोपी घटनास्थळावरून तातडीने फरार झाले. या संपूर्ण थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
या गंभीर घटनेनंतरही Abhijeet Dipke यांनी अत्यंत समजूतदारपणा दाखवत आपल्या संतप्त कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र, आपल्या नेत्याला एकापाठोपाठ दोन-तीन कानशिलात लागल्याचे पाहिल्यामुळे आक्रमक झालेले कार्यकर्ते शांत होण्यास तयार नव्हते, ज्यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भर दिवसा आणि पोलिसांच्या उपस्थितीत एवढ्या मोठ्या आंदोलनात हा हल्ला करणारे नेमके कोण होते? त्यांना कोणाचा पाठिंबा होता? आणि पोलिसांनी या पळून गेलेल्या हल्लेखोरांना अद्याप अटक केली आहे की नाही, याबाबतची अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. आगामी तपासात याचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
अभिजीत दीपके भारतात आल्यापासून वेगवेगळ्या राज्यांत जाऊन परीक्षा घोटाळ्यांविरोधात आवाज उठवत आहेत. यापूर्वी दिल्लीतील जंतरमंतर आणि पुण्यात झालेल्या त्यांच्या यशस्वी आंदोलनानंतर आज जयपूरमध्ये हे आंदोलन सुरू होते. मात्र, या हल्ल्याच्या घटनेमुळे देशभरातील Cockroach Janta Party च्या समर्थकांमध्ये आणि विद्यार्थी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावर हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. हल्लेखोरांवर पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई झाली याची अद्याप समोर आली नाही.









