ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये अग्नितांडव, नागरिकांना वाचवताना बिचुकलेच्या जवानाचे बलिदान

Thane News शहीद सागर शिंदे यांचा अस्तिकलश उद्या बिचुकले येथे अंतिम दर्शनासाठी ठेवणार
सातारा/प्रतिनिधी
Thane News सातारा जिल्ह्यातील बिचुकले (ता.कोरेगाव) फायर ब्रिगेड विभागात अधिकारी पदावर कार्यरत असलेले शहीद सागर शिंदे यांनी नागरिकांचे प्राण वाचवताना स्वतःचे प्राण अर्पण केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
काल पहाटे ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले सागर शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग इतकी तीव्र होती की मार्केटमधील काही नागरिक गाळ्यांमध्ये अडकून पडले होते. धूर आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर व्यापला असतानाही त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले.
जीव धोक्यात घालून त्यांनी एका नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र दुसऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आतमध्ये गेले असताना अचानक आगीने अधिक भीषण रूप धारण केले. या जीवघेण्या बचावकार्यादरम्यान शहीद सागर शिंदे आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि मानवतेचे सर्वोच्च उदाहरण ठरलेल्या सागर शिंदे यांच्या बलिदानाने संपूर्ण बिचुकले गावासह पंचक्रोशी हळहळ व्यक्त करत आहे. नागरिकांचे प्राण वाचवताना आलेले हे वीरमरण प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणणारे ठरले आहे.
त्यांच्या पश्च्यात आई , भाऊ, पत्नी, दोन महिन्याची मुलगी, एक बहीण असा परिवार आहे. शांत व संयमी असलेल्या सागर यांचा बिचुकले गावात सामाजिक कामात सक्रिय सहभाग होता. समस्त बिचुकले ग्रामस्थांनी शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत शहीद सागर शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. संपूर्ण परिसर भावूक झाला आहे.
रविवारी बिचुकले येथे अस्थिकलश दर्शन व शोकसभा
दरम्यान, उद्या सकाळी ठीक १० वाजता संपूर्ण बिचुकले गाव व पंचक्रोशीच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहीद सागर शिंदे यांचा अस्तिकलश अंतिम दर्शनासाठी बिचुकले येथे ठेवण्यात येणार आहे. आपल्या वीर योद्ध्यास अखेरचा सॅल्यूट करण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बिचुकले ग्रामस्थानी केले आहे.











