CRIME NEWS डीपी चोरीत पकडला आणि घरफोडीचा सूत्रधार निघाला, वाठार पोलिसांकडून घरफोडी उघडकीस

सोन्याच्या दागिन्यांसह ९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत, आणखी गुह्यात सहभागाची शक्यता
सातारा/प्रतिनिधी
CRIME NEWS पाच वर्षांपूर्वीपासून शेतातील डीपी चोरीच्या एका गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात वाठार पोलिसांच्या डीबी (गुन्हे शोध) पथकाला यश आले होते दोन दिवसापूर्वी ऊसाच्या फडात पाठलाग करून आरोपी लखन भोसले याला पोलिसांनी जेरबंद केले होते अटक केल्यानंतर या आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, त्याने सोनके (ता. कोरेगाव) येथील घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ९,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्याचे अनेक गुन्ह्यांशी कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनके (ता. कोरेगाव) येथे एका घराचे कुलूप तोडून घरफोडी झाली होती. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी वाठार हद्दीतील घरफोडी व चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे सक्त आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी डीबी पथकाला फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधासाठी विशेष सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, डीबी पथकाला एका संशयित आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. हा आरोपी ५ वर्षांपूर्वीच्या एका जुन्या गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. सपोनि सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले. यावेळीही त्याने गुंगारा देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी एक किमी पाठलाग करीत लखन भोसले याला ऊसाच्या शेतातून ताब्यात घेतले, त्याला पोलिसी खाक्या दाखवत अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने सोनके येथील घरफोडीचा गुन्हा स्वतःच केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त केली आहे. या आरोपीने आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या पथकाने केली कामगिरी: सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वाठारचे प्रभारी अधिकारी सपोनि सुशील भोसले, पोउनि गहिनीनाथ सातव, पोउनि नितीन भोसले, सपोफौ बुवासो वाघमारे, पो.हवा. उदय जाधव, जितेंद्र शिंदे, आनंदराव भोसले, अमोल कर्णे, किशोर गिरी, दीपक साबळे, प्रकाश चव्हाण, सहदेव तुपे, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, प्रतीक देशमुख, प्रकाश मेळावणे, विजय ढाणे, माणिक कोळपे तसेच महिला पोलीस कर्मचारी दीपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख आणि पूजा जगताप यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा उदय जाधव करत आहेत.











