Wagholi Leopard Attack वाघोली येथे बिबट्याची दहशत ! पहाटेच्या हल्ल्यात ६ शेळ्या ठार; ग्रामस्थांमध्ये भीती

Wagholi Leopard Attack १५ दिवसांपूर्वीच वाघोली शेजारील अनपटवाडीत विहिरीत बिबट्या आढळला होता
वाघोली: Wagholi Leopard Attack वाघोली येथील गावठाण परिसरात दत्त मंदिराजवळ सोमवारी पहाटे बिबट्याने धुमाकूळ घालत तब्बल सहा शेळ्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बिबट्याच्या भीषण हल्ल्यात ग्रामपंचायत कर्मचारी संजय भोईटे यांच्या सहा शेळ्या जागीच ठार झाल्या असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून हा हल्ला केला. सकाळी जेव्हा ही घटना उघडकीस आली, तेव्हा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावठाण सारख्या मुख्य रहिवासी भागातच बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांपूर्वीच वाघोली शेजारील अनपटवाडी येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने अत्यंत शिताफीने रेस्क्यू करून वाचवले होते. त्यावेळी त्या बिबट्याला सुखरूपपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच पुन्हा एकदा बिबट्याने लोकवस्तीत येऊन केलेला हा हल्ला अत्यंत चिंताजनक मानला जात आहे. १५ दिवसांपूर्वी विहिरीतून रेस्क्यू केले त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बिबट्याने दाखवलेले अस्तित्व हे या भागात बिबट्यांची संख्या वाढल्याचे दर्शवत आहेत या हल्ल्याची भीती आता ग्रामस्थांच्या मनात घर करून राहिली आहे.
या घटनेची माहिती वन विभागाला तातडीने देण्यात आली असून, घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तसेच वन विभागाने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, परिसरात पिंजरा लावावा आणि नागरिकांच्या, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी वाघोलीतील सर्व ग्रामस्थांकडून केली जात आहे.












