Satara News : सैनिकांच्या अंबवडेतील लेकीची जिद्द; सैन्यदलात यशस्वी भरारी

कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिसपदी निवड
सातारा/प्रतिनिधी Satara News कोरेगाव तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हंणून ओळख असलेल्या अंबवडे (समत वाघोली, ता. कोरेगाव) येथील एका सामान्य कुटुंबातील प्रगती अश्विनी अजित साळुंखे या कन्येने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्यदलात स्थान मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिची भारतीय सैन्यदलातील कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिस दलासाठी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिची कामगिरी ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
अंबवडे (समत वाघोली) गावातील तसेच पंचक्रोशीतील या पदावर निवड होणारी प्रगती ही पहिलीच युवती ठरली असून, तिच्या निवडीसाठी ती वर्षभराहून अधिक काळ प्रयत्नशील होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या प्रगतीने अडचणींचे भांडवल न करता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे पूर्ण झाले.
लहानपणापासूनच देशसेवेची आणि भारतीय सैन्यदलात भरती होण्याची तीव्र इच्छा तिच्या मनात होती. हे स्वप्न साकार करण्यासाठी ती सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेत असताना राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये (एनसीसी) सलग तीन वर्षे सक्रिय राहिली. तिच्या नेतृत्व गुणांचे दर्शन पुणे येथे आयोजित आर्मी अटॅचमेंट कॅम्प २०२५ मध्ये घडले. या कॅम्पमध्ये तिने संपूर्ण युनिटचे कमांडिंग करण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली होती.
या पार्श्वभूमीवर सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करत प्रगतीने आपल्या मेहनतीची आणि आत्मविश्वासाची प्रचीती दिली आहे. तिच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबीयांचे पाठबळ तसेच अंबवडे येथील परिसरातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिक्षणाचे मोलाचे योगदान आहे.
ग्रामस्थांकडून लेकीचा गौरव
प्रगतीने मिळवलेल्या या यशानंतर अंबवडे गावामध्ये तिचे मोठ्या उत्साहात, जल्लोषात स्वागत झाले. ग्रामस्थांनी मिठाई वाटून आपलेपणाने तिचा गौरव केला. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहिली आणि त्यासाठी अथक परिश्रम घेतले, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, हे प्रगती साळुंखे हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले असून, तिचे हे यश प्रेरणादायी आहे.











