Satara Collector Santosh Patil वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार : जिल्हाधिकारी संतोष पाटील

महाराष्ट्र वन न्यूज | विशेष बातमीदार (वाठार स्टेशन)
Satara Collector Santosh Patil वाठार स्टेशन आणि कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या ‘वाघ्या घेवड्याचा’ खरीप पीकविमा योजनेत समावेश करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहे. वाठार स्टेशन आणि विखळे परिसरात खरीप पिकांची पाहणी करण्यासाठी आले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेवडा पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पावसाच्या ओढीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
या दौऱ्यादरम्यान कोरेगावचे प्रांत प्रमोद कुदळे आणि तहसीलदार संगमेश कोडे उपस्थित होते. सातबारा उताऱ्यावर खरीप पिकांची नोंदणी करणे आणि ई-पीक पाहणीच्या कामाची पाहणी करत असताना, स्थानिक शेतकऱ्यांनी वाघ्या घेवडा पिकाचा पीकविमा भरता येत नसल्याची अडचण जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, घेवडा हे पीक सध्या पालेभाजी वर्गात मोडत असल्यामुळे त्याचा चालू खरीप पीकविमा योजनेत समावेश झालेला नाही. मात्र, या भागातील शेतकऱ्यांचे हे मुख्य नगदी पीक असल्याने, त्याचा खरीप पिकांच्या यादीत समावेश करण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत राज्य शासन आणि संबंधित विमा कंपनीला सुधारित प्रस्ताव पाठवला जाईल. वाघ्या घेवड्याचा खरीप पिकांमध्ये समावेश झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा पीकविमा भरता येणे शक्य होणार आहे.
यासोबतच, ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी दूर करून सातबारा नोंदणी वेळेत आणि अचूक पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महसूल यंत्रणेला दिले. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी करण्याचे आवाहन करत, महसूल सहाय्यक, तलाठी आणि मंडलाधिकारी यांना कामातील अडचणी समजून घेऊन मदत करण्याचे आदेश दिले.
या पाहणी प्रसंगी तलाठी सचिन माळी, महसूल सेवक मोहसीन पठाण, हणमंत तावरे, कोरेगाव तालुका शिवसेना उपप्रमुख चंद्रकांत काका पवार, कमलाकर भोईटे, विकास मतकर, सुरेंद्र लोंढे, कालिदास काळोखे, चेतन लोंढे, राजेंद्र लोंढे, सतीश जाधव, संतोष जाधव, सचिन जाधव, दत्तात्रय अहिरेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बांधावर येत घेतलेल्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.











