
Redio Jockey विषयी परिपूर्ण माहिती जाणून घ्या
Redio Jockey सन १९२०-३० च्या दशकात सुरू झालेला आकाशवाणीचा प्रवास १९८० च्या दशकात भारतात स्थिरावला. २३ जुलै १९७७ रोजी चेन्नई येथे एफ. एम. सुरू झाले. सन १९९३ पर्यंत रेडिओ सिटी बेंगलोर हे भारतातील पहिले खाजगी एफ. एम. रेडिओ स्टेशन ठरले. ‘द टाईम्स ग्रुपने’ रेडिओ मिर्ची हे स्टेशन २००१ रोजी इंदौर येथे सुरू केले. महाराष्ट्राचा विचार करता एफ. एम. केंद्र २००२ मध्ये सुरू झाले. आज रेडीओ मिर्ची’, ‘रेडीओ सिटी’, ‘रेड एफ. एम.’, ‘एफ. एम. गोल्ड, इत्यादीवर आपण २४ तास मनोरंजनाचे कार्यक्रम, त्यातही तरुणांना आकर्षित करणारी गाणी सतत ऐकवली जातात.
तरुणांबरोबरच समाजातील सामान्य लोकांच्या, गृहिणींच्या भावनांना सर्वापर्यंत रेडिओच्या माध्यमातून रेडियो जॉकी पोहोचवत असतो.
आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे ओघवत्या व प्रभावी शैलीत निवेदन करणाऱ्या व्यक्तित्वाला रेडिओ जॉकी Redio Jockey किंवा आरजे तर मराठीत याला ‘उद्घोषक’ म्हणतात. तो गाण्यामधला कलात्मक भाव आणि लोकांच्या मानवी भावना यामधला एक मनोरंजक असा दुवा असतो.
आकाशवाणी निवेदकावरून रेडियो जॉकीची निर्मिती ही बदलत्या काळामुळे झाली आणि या क्षेत्राला चिरतारुण्य त्याने दिले. गाणी ऐकवताना विनोद करत हवामान, बातम्या, सामाजिक दैनंदिन घडामोडी, शेती, आरोग्य, खेळ, स्पर्धा, मनोरंजन अशा विषयांना तो आपल्या कवेत घेत सर्वाना त्याची अभ्यासपूर्ण आणि सुलभ माहिती देत असतो. अवघड विषय प्रत्येकाला सोपे करून सांगण्याची कला त्याला अवगत असते. रेडिओवर स्वार होऊन शब्दांची घोडदौड करत स्वतंत्रपणे आपले मत विचार, मुद्दे, कला लोकांपर्यंत आपल्या ओघवत्या शैलीने व गप्पांच्या मार्गाने तो पोचवत असतो.
आजच्या तरुण पिढीला समर्पक आणि जुन्या पिढीच्या हृदयाचा तरुणपणा बाहेर काढू शकणारा अत्यंत तरबेज असा मनोविश्लेषकच तो जणू असतो.
त्यासाठी खरे म्हणजे त्याला चांगले बोलता येणे म्हणजेच उत्कृष्ट संवादकौशल्य ही या क्षेत्रातील मूलभूत गरज आहे. यासोबत उत्तम वाचन, व्यासंग, निरीक्षण कौशल्य, अद्ययावत विचार, हजरजबाबीपणा, प्रसंगावधानपणा, विनोदक्षमता, चालु घडामोडींचे ज्ञान गरजेचे असते.
त्याच्याकडे सर्जनशीलता, कल्पकता, सहजता हे गुण असावेत. त्याला बोलण्याची, गप्पा मारण्याची आवड आणि भाषा, साहित्य, सांस्कृतिक घडामोडी यांची चांगली जाण हवी. चित्रपट, संगीत आणि नाट्यक्षेत्रासंबंधीचे ज्ञान आणि सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिकबाबतचे चांगले सामान्यज्ञान हवे. त्याने समाजमाध्यमावरील नवीन प्रवाह, त्यामधील अद्ययावतता यांबाबत सतर्क राहून सांख्यिकीय माहिती अद्ययावत ठेवावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वावर त्याचे स्वतःचे एक ठाम आणि परिपक्व असे मत करावे.
आजच्या अभ्यासक्रमात मीडिया कॉलेजमधून एक विषय रेडियो आणि रेडियो जॉकी हा विषय आहे आणि आज अनेक खासगी क्लासेस रेडियो जॉकी होण्याचे बेसिक ट्रेनिंग देतात. तरीही यातील एक विशिष्ट पदवी घेणे आवश्यक आहे. जर या क्षेत्रात यायचे असेल तर रेडिओ पब्लिशिंग, न्यूज रिपोर्टिंग, स्पीच ब्रॉडकास्ट जर्नलिझम किंवा मीडिया विश्लेषण या क्षेत्रात तुमची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय या रोमांचक करिअरच्या मार्गाची निवड करण्यासाठी आपण रेडिओ प्रोग्रामिंग आणि व्यवस्थापनामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डिप्लोमा तसेच पोस्ट ग्रॅज्युएट करू शकतो. घोषणा, प्रसारण, तुलना आणि डबिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्याचबरोबर पत्रकारिता आणि जनसंवाद करू शकतो. याचबरोबर रेडिओ, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडियामध्ये बॅचलर आणि टीव्ही, रेडिओ आणि फिल्ममध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून अशा मार्गांनी वेगळे करियर करू शकतो.
Redio Jockey courses कुठे आहेत सुरु
यासाठी Redio Jockey बनण्यासाठी भारतीय विद्या भवन, नवी दिल्ली, जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली, क्राफ्ट फिल्म स्कूल, नवी दिल्ली, ख्रिस्त विद्यापीठ, बंगलोर, रेडिओ स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग, मुंबई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन, पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड न्यू मीडिया, बंगलोर ही काही महाविद्यालये तसेच विद्यापीठे आहेत. येथे तुम्हाला रेडिओ ब्रॉड कास्टिंग, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग आणि यासारख्या महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील.
Redio Jockey साठी येथे आहेत Career संधी
रेडिओ जॉकी स्पीच मॉड्युलेशन, शब्द लेखन, योग्य उच्चार आणि भाषेचे ज्ञान आणि शब्द संग्रह यासारख्या पात्रतेच्या आधारावर आपण ए.एम.एफ.एम चेनेल, ऑल इंडिया रेडीओ, जाहिरात एजेन्सी तसेच सरकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकते. याबरोबरच खाजगी क्षेत्रात अजूनही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. भारतात एफ.एम. गेल्या पंधरा वर्षात आले. याची प्रत्येक पीढीगणिक वाढत चाललेली प्रगती आणि मनोरंजनाची गरज एफ.एम चैनल्सना एक चांगले भविष्य देऊन गेली आहे. आज ते छोट्या गावांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.
रेडियो हा डिजिटल क्षेत्राच्या हातात हात घेऊन पुढे वाटचाल करत असल्याने भारतात या क्षेत्राकडे खुप सकारात्मकपणे पाहिले जाते. रेडियो जॉकी हा पार्ट टाइम जॉब करणारा नसून तो एफ.एम. कंपनीचा चेहरा असतो. रेडियोवर त्याचा कार्यक्रम करण्याखेरीज जाहिरात लेखन, वॉइस ओवर, क्रिएटिव राइटिंग, ऑडिओ सॉफ्टवेयर हैंडलिंग, ऑडियो एडिटिंग, इंटरव्ह्यू, गाण्यांची मॅनेजमेंट अशा विविध कामामध्ये तो गुंतलेला असतो. ही कामे आपल्याला माहीत नसल्याने पालकांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही तितकासा बदललेला नाहीये. पण एका चांगल्या कलाकाराला हे क्षेत्र खुप सांभाळून घेऊन एक उत्तम असे भविष्य देऊ शकते. त्यासोबतच येणारी प्रसिद्धी आणि आवाजाच्या दुनियेतला अप्रतिम अनुभव देखील तुम्हाला उत्पन्नाचे अनेक मार्ग उघडून देतात. त्यामुल्र या क्षेत्राकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सकारात्मकपणे पाहिले पाहिजे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यानो, या रेडीओ जॉकी या क्षेत्राकडे एक खूप चांगला करियर ऑप्शन म्हणून पहा कारण आर जे हा एक अनुभव आहे हुशार होण्याचा, खुप मित्र कमवण्याचा, आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचा, जनमानसाशी संपर्क वाढवण्याचा आणि भाषण स्वातंत्र्याचा. याचा सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे. तुम्हालाही या आधुनिक प्रवाहात सामिल होता येऊ शकते जर आपण मनापासून ठरवणार असाल तुम्हीही एक खूप चांगले आर.जे.बनू शकता आणि आपल्या उभरत्या भविष्याला निश्चितच आकार देऊ शकता.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५







