Gopalkala Deur 2026: लेझीम, टिपऱ्या आणि भारूड सोगांनी रंगला देऊरचा गोपाळकाला, प्रत्येकाने पहावा असा सोहळा

सातारा | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
‘विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख स्वर्गी नाही’ या संत उक्तीला साजेसा आणि सुरेख कृष्णलीला जपणारा पारंपरिक गोपाळकाला महोत्सव कोरेगाव तालुक्यातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र देऊर नगरीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
सलाबादाप्रमाणे आषाढी एकादशीनंतर पंढरपुरातील गोपाळपुरात आणि कोरेगाव तालुक्यातील प्रति पंढरपूर देऊर या ठिकाणी गोपाळकाला भरतो. खरंतर पंढरपूरमधील गोपाळकाला झाल्यानंतर वारकरी आपापल्या घराकडे परत फिरतात, मात्र देऊर नगरीतील हा गोपाळकाला अत्यंत आगळा-वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने भरवला जातो.
पारंपरिक सोंगांच्या भव्य स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
चालू वर्षी या गोपाळकाल्यात पारंपरिक सोंगांची जोपासना व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साप्ताहिक संघटना, महाराष्ट्र वन न्यूज चॅनेल व सातारा समाचार मीडिया पुरस्कृत आणि माऊली प्रसाद मंडळ आयोजित ‘सोंगांच्या भव्य स्पर्धा’ भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धांना भाविक आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.दुपारी माऊली पादुका दर्शन करून माऊली दिंडी श्री विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आल्यानंतर या सोहळ्याला सुरुवात झाली. सुरुवातीला सुरेख कृष्णलीला, त्यानंतर विटी-दांडू, चेंडू-फळी, गोट्या, हमामा, ढोल-टिपरी, लेझीम यांसारखे पारंपरिक खेळ रंगले.

विविध सोंगांनी जिंकली भाविकांची मने!
यानंतर टिपरी नृत्य, ढोल-लेझिम आणि पारंपरिक करडी वाद्याच्या तालावर ठेका धरत विविध सोंगांनी उपस्थित शेकडो ग्रामस्थांचे मनोरंजन करत समाजप्रबोधन केले. यामध्ये रेड्यावरून आलेले यमराज, पोतराज, नाभिक, वेडी, झाडपाल्याचे औषध विक्री करणारा वैदू अशा विविध सोंगांनी उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यात महिला भाविकांची उपस्थिती अत्यंत लक्षणीय होती. यंदा श्री.मुधाईदेवी विद्यालयाच्या शालेय विद्यार्थानीही या उत्सवात सक्रिय सहभाग घेत रूपके सादर केली.
विजयी स्पर्धकांचा भव्य गौरव
सोंगांच्या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या प्रथम तीन क्रमांकांना साप्ताहिक संपादक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम, महाराष्ट्र वन न्यूज चॅनेलचे संपादक प्रकाश राजे आणि देऊर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन धनसिंग कदम यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माऊली प्रासादिक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सोंगांच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री मुधाई विद्यालयाचे प्रा. काटकर सर, प्रा. राजू बागुल सर, प्रा. शुभांगी शिंदे मॅडम आणि प्रा. शैलजा खुडे मॅडम यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले. अखेर “गोपाळकाला गोड झाला, देव आमच्या घराशी आला” या अभंगाने या मंगलमय गोपाळकाल्याची सांगता झाली.











