MPSC Protest :आंदोलन स्थगित! अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्थीला यश,

MPSC Protest :आंदोलन स्थगित! अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्थीला यश,

पुण्यात मध्यरात्री हाय वोल्टेज चर्चा व शिष्टाई

पुणे | महाराष्ट्र वन न्यूज

MPSC Proest महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय घेतल्यानंतर रविवारी रात्री उशिरा आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मध्यस्थीने सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये तोडगा निघाला. हाय वोल्टेज चर्चा आणि शिष्टाईने आंदोलन गाजले.

गेल्या ११ दिवसांपासून पुण्यातील एस. एम. जोशी पुल परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनात MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी प्रमुख होती. मात्र, राजीनाम्याऐवजी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्यास सहमती दर्शवली.

चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोग

MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि इतर अनियमिततांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची नियुक्ती करण्यात येणार असून, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

या चौकशीमध्ये केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित न राहता पेपरफुटीच्या आरोपांशी संबंधित विविध परीक्षांची तपासणी करण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील पुरावे आयोगासमोर सादर करता येणार आहेत. चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव असल्याचे वृत्त आहे.

अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, स्वतः भीमनवर यांचे ट्विट

आंदोलनकर्त्यांनी MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र, सरकारने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावर कार्यरत न राहता सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला.भीमनवार यांनीही चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याची भूमिका समाजमाध्यमांवर मांडली.मध्यरात्री उशिरा स्वतः याबाबतचे ट्विट केले यानंतर आंदोलन ते मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी दाखवले व विद्यार्थी प्रतिनिधी विवेकानंद पाटील यांनी वाचून दाखवले आंदोलन तत्वतः मागे घेतल्याचे सांगितले.

शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्थीला यश

आंदोलनस्थळी सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.चर्चेदरम्यान चौकशी आयोगाची स्थापना, MPSC अध्यक्षांना रजेवर पाठवणे, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाही आणि भरतीच्या पदसंख्येत वाढ यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सरकारकडून महत्त्वाच्या मागण्यांवर निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले.

२०२७ मधील गट-क परीक्षेतील पदसंख्या दुप्पट करण्याची मागणी मान्य

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेत सुधारणा आणि उपलब्ध पदसंख्येत वाढ करण्याची मागणी केली होती. २०२७ मधील गट-क परीक्षेतील पदसंख्या दुप्पट करण्याची मागणी मान्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. याशिवाय आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

इतर मागण्यांवर झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी कशी आणि कोणत्या कालमर्यादेत होणार, याकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

आंदोलन स्थगित; आता अंमलबजावणीकडे लक्ष

सरकारच्या निर्णयानंतर पुण्यातील आंदोलन स्थगित झाले असले, तरी MPSC परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी आणि भरती प्रक्रियेतील सुधारणांचे काम अद्याप बाकी आहे. चौकशी आयोगाचा अहवाल, दोषींवरील संभाव्य कारवाई आणि सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी हे पुढील काळातील महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत.

महाराष्ट्र वन न्यूज — आपला महाराष्ट्र… आपली बातमी!

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू