MPSC Studant Protest पेपरफुटी प्रकरण पेटले! आमदार शशिकांत शिंदेंचा सरकारला ४८ तासांचा अल्टीमेटम; तुकाराम मुंडेंबाबत मोठी मागणी

महाराष्ट्र १ न्यूज (विशेष बातमी) |पुणे/कोरेगाव:
MPSC Studant Protest परीक्षा प्रक्रियेतील कथित पेपरफुटी, भरतीतील महाविलंब आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला आता प्रचंड राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी रविवारी मध्यरात्री थेट आंदोलनस्थळी धाव घेत विद्यार्थ्यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे तर, राज्य सरकारला दोन दिवसांचा (४८ तास) थेट अल्टीमेटम देत, निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा कडक इशारा दिला आहे.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे नेते सतेज (बंटी) पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
“हा राजकीय स्टंट नाही, तरुण पिढीचा आक्रोश!” – शशिकांत शिंदे
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसले. ते म्हणाले, “सातारा, सांगली, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आणि गरिबांची मुले रात्रीचा दिवस करून MPSC चा अभ्यास करतात. मात्र, वर्षानुवर्षे अभ्यास करूनही ऐनवेळी पेपर फुटतात, निकाल रखडतात. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चाललेला खेळ आता खपवून घेतला जाणार नाही. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नसून अन्यायाविरोधात पेटलेल्या युवा शक्तीचा आक्रोश आहे!”
MPSC ची सूत्रे तुकाराम मुंडेंकडे सोपवा!
एमपीएससी परीक्षा प्रक्रियेतील घोटाळे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी एक मोठी मागणी केली. “परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणायची असेल, तर तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कडक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे MPSC ची जबाबदारी सोपवण्यात यावी,” असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आंदोलनातून ही मागणी लावून धरावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
“आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास गाठ माझ्याशी!”
गेल्या चार दिवसांपासून विद्यार्थी उपोषणाला बसले असूनही सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पुण्यात जमलेली विद्यार्थ्यांची ताकद लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देईल. या आंदोलनात फूट पाडण्याचा किंवा ते दडपण्याचा प्रयत्न झाल्यास, विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात मी स्वतः सर्वात पुढे असेन, असे स्पष्ट सांगत शिंदेंनी सरकारला थेट आव्हान दिले आहे.










