Satara Crime News तोतया पोलीस अडकले खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात; ७ जणांच्या टोळीकडून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

वर्धनगड घाटात बॅरिकेडिंग लावून वाहनचालकांना लुटले
पुसेगाव/सातारा:
Satara Crime News संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी वारीच्या बंदोबस्तासाठी अहोरात्र कार्यरत असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस असल्याची खोटी बतावणी करत वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या ३ महिलांसह एकूण ७ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी २ चारचाकी वाहने, ८ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सर्व आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण कारवाईची अधिकृत माहिती दिली.
१३ जुलैच्या मध्यरात्री वर्धनगड (ता. खटाव) येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ काही जणांनी खाकी वेश परिधान करून आणि लोखंडी बॅरिकेडिंग लावून रात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडवण्यास सुरुवात केली होती. स्वतःला पोलीस सांगून ते कारवाईची भीती दाखवत वाहनचालकांकडून पैसे उकळत होते. या प्रकाराची गोपनीय माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे वाहन येताना दिसताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांचा पाठलाग करून पोलिसांनी ४ पुरुष आणि ३ महिलांना रंगेहात ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विकास दत्तात्रय शिंदे (रा. वाळवा), वैभव पांडुरंग पवार, राहुल सुनील पाटील, केतन बाबासाहेब महाजन, प्रियांका संजय भोरे, अरुणा दयानंद आवळे (सर्व रा. मिरज, सांगली) आणि प्रियांका रणदीप नाईक (रा. शिरोळ, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. आरोपींनी तेथे उपस्थित दोन दुचाकीस्वारांना धमकी देऊन ५०० रुपये उकळल्याचे समोर आले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून टाटा सफारी स्टॉर्म (MH-12 MF-3832), मारुती स्विफ्ट डिझायर (MH-10 CA-4937) आणि ८ अँड्रॉइड मोबाईल जप्त केले आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस हवालदार योगेश बागल, रेश्मा भोसले, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, उमेश देशमुख, दयाबा नरळे आणि चालक तुषार बाबर यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी वारीच्या काळात ग्राम सुरक्षा यंत्रणा, तरुण आणि नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, गावात पोलीस असल्याचे भासवून कोणी पैशांची मागणी करत असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.










