Shivsena ६० वा वर्धापन दिन, ३० अंगणवाड्या अन् चिमुकल्यांचा आनंद! कोरेगावात राजाभाऊ बर्गे यांचा ‘शिवसेना पॅटर्न’

कोरेगाव/प्रतिनिधी कोरेगाव शहराला लाभलेली शैक्षणिक परंपरा किती समृद्ध आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, Shivsena पक्षाच्या साठाव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधत शहरात एक अत्यंत कौतुकास्पद आणि आदर्श सोशल पॅटर्न राबविण्यात आला. ‘दरबार उद्योग समूहा’च्या माध्यमातून नेहमीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकीचे भान जपत कोरेगाव शहरातील सर्व ३० अंगणवाड्यांमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आकर्षक गणवेष आणि खाऊचे थेट वाटप करण्यात आले.
बालपणातच विद्यार्थ्यांची पायाभरणी सुसंस्कारित आणि सक्षम व्हावी, तसेच शिक्षणाच्या या पहिल्या टप्प्यात पालकांवर कोणताही आर्थिक भार पडू नये, या उद्देशाने हा भव्य उपक्रम पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शहराच्या शैक्षणिक विकासाची ग्वाही दिली आणि अंगणवाड्यांचा दर्जा उंचावण्यासाठी भविष्यात निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम शब्द दिला.
या उपक्रमाची व्यापकता एवढी मोठी होती की, शहरातील वाईड नेटवर्कच्या माध्यमातून सर्व केंद्रांवर एकाच वेळी आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. राहुल फत्तेसिंह बर्गे, माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी, निलेश घनवट, युवा नेते निशांत माने, अजित कदम, सुधीर बर्गे आणि काका प्रभुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडला.
‘जो शिकेल तो टिकेल’ या सिद्धांतानुसार कोरेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांमधून उद्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवंत घडवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात या अंगणवाड्या अधिक सुसज्ज आणि सुरक्षित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष सहकार्यातून जास्तीत जास्त विकास निधी खेचून आणणार असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी स्पष्ट केले. उमा सोमनाथ चिनके, जयश्री तिवाटणे, हेमा भोईटे, रेश्मा माने यांच्यासह शहरातील सर्व अंगणवाडी सेविकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
या सामाजिक उपक्रमाच्या जोडीलाच कोरेगावच्या राजकीय वर्तुळाला दिशा देणारा एक मोठा निर्धारही या प्रसंगी करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या गतिमान नेतृत्वाखाली आगामी काळात कोरेगाव शहर, तालुका आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद कैक पटीने वाढवणार असल्याचा विश्वास राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील आतापर्यंतचा कायापालट आणि विकास केवळ शिवसेनेच्या माध्यमातूनच शक्य झाला असून, विकासाची हीच घोडदौड भविष्यातही अविरतपणे सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.











