Satara News :घिगेवाडीत प्रबोधन अभियानाचा धडाका! महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, एसटी कार्ड आणि मोफत विजेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन

Satara News सरपंच नारायण सावंत यांच्या प्रयत्नातून कार्यशाळा
सातारा/प्रतिनिधी
Satara News कोरेगाव तालुक्यातील घिगेवाडी नगरीमध्ये ‘अभियान प्रारंभ मोहीम’ अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक व शासकीय उपक्रमांनी संपन्न झाली. ग्रामपंचायत कार्यालय आणि श्री हनुमान मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, एसटी महामंडळाच्या योजना आणि महावितरणच्या सौर ऊर्जेबाबत ग्रामस्थांना सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमेत प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या विभागांच्या वतीने मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात कोरेगाव पोलीस निर्भया पथकाच्या वतीने महिला संरक्षण कायदा, वाढत्या आर्थिक फसवणुकीसह सायबर गुन्हे, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेले ‘गुड टच-बॅड टच’ आणि मोटार वाहन कायद्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. कोरेगाव विभागाच्या पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नामदेव जाधव, आरती यादव, विजय बर्गे आणि विजय राठोड यांनी ग्रामस्थांना आणि महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करत जागरूक केले.
दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने प्रवाशांच्या सुविधेसाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘NCMC कार्ड’ नोंदणीबाबत माहिती देण्यात आली. एसटी महामंडळाचे प्रतिनिधी सतीश धुमाळ यांनी या कार्डचे महत्त्व आणि त्याचा प्रवाशांना होणारा फायदा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तिसऱ्या सत्रात ‘महावितरण’ कंपनीच्या वतीने गावस्तरीय विशेष मार्गदर्शन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ‘महाराष्ट्र स्मार्ट सोलर योजना-२०२५’ (स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी छतावरील सौर योजना) या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती देण्यात आली. “सूर्य देईल मोफत वीज – वीज बिल करा कायमचे शून्य” या संकल्पनेवर आधारित असलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे शाखाप्रमुख कपिल मर्ढे आणि राहुल वाघ यांनी केले. त्यांनी सौर ऊर्जेमुळे पैशांची कशी बचत होते, याबद्दल ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन केले.
या महत्त्वपूर्ण मोहिमेप्रसंगी घिगेवाडीचे लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत, चेअरमन धनसिंग सावंत यांच्यासह रघुनाथ सावंत, आदिनाथ सावंत, भास्कर घिगे, अमृत सावंत, राजेंद्र सावंत, सदाशिव साळुंखे, अजित सावंत, पराग सावंत, प्रमोद भोसले, कुणाल सावंत, विलास साळुंखे, मानसिंग सावंत, संगिता घिगे, शांता सावंत, भारती घिगे, मंजुषा सावंत, मनिषा धुमाळ, विश्वनाथ बर्गे, तानाजी भोसले, तेजस घिगे, भिमराव सावंत, बजरंग सावंत, संभाजी बर्गे, संतोष सावंत, सोपान सावंत, जितेंद्र सावंत, राज साळुंखे आणि विशाल बर्गे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ घिगेवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.











