Shivsena News कोरेगावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे राजाभाऊ बर्गे यांना पाठबळ

प्रकाश राजे/ कोरेगाव :Shivsena News कोरेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, शहरातील विकासकामे प्रलंबित न राहता ती तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी आणखी निधी देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी विकासकामांसाठी पुढाकार घ्यावा, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारच्या गांधी मैदानावर सोमवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सभेदरम्यान व्यासपीठावर पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख हणमंतराव जगदाळे, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या उपस्थितीत बर्गे यांच्याशी संवाद साधताना शिंदे यांनी कोरेगाव शहरासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव आणि रणजीतसिंह भोसले उपस्थित होते.
विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. नगर विकास मंत्रालयाबरोबरच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही कोरेगाव शहरासाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच, राजाभाऊ बर्गे यांनी प्रभागनिहाय विकासकामांचे प्रस्ताव तयार करून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सादर करावेत. ते प्रस्ताव माझ्याकडे पाठवा, मी त्यांना तत्काळ मंजुरी देईन, असेही त्यांनी नमूद केले.
महायुती सरकारच्या कार्यकाळात कोरेगाव शहराचा विकासाभिमुख कायापालट झाला असल्याचे सांगताना शिंदे यांनी, शिवसेना कोरेगाव शहर, तालुका आणि विधानसभा मतदारसंघात सक्षम असून, पक्ष तुमच्या पाठीशी ठाम आहे. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दात कार्यकर्त्यांना संदेश द्या, असे राजाभाऊ बर्गे यांना सुचित केले. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पुढील काळात अधिक लक्ष देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोरेगाव शहरासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. लवकरच सातारा येथे यासंदर्भात बैठक घेण्यात येईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले जातील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेचा कोरेगाव शहर व मतदारसंघात व्यापक विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी शहर व मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवरही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. व्यासपीठावर सुमारे सात मिनिटे झालेला हा संवाद संपूर्ण जिल्हा व राज्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाहिला.
राजाभाऊ बर्गे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
कोरेगाव चे प्रथम नगराध्यक्ष आणि जनतेचे नेतृत्व असलेले प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी संपूर्ण कोरेगाव तालुक्यातील जोरदार शक्ती प्रदर्शन करत गांधी मैदानावरील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला हजेरी लावली. कोरेगाव शहर परिसर आणि तालुक्यातून हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी जाहीर सभेत उपस्थित राहून कोरेगाव तालुका भगवामय करण्याचा निर्धार केला. एकूणच कोरेगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद आता वाढू लागले असून गावोगावी शाखा स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.











