Satara News पिंपोडेत मराठी भाषा दिनाचा गौरवशाली जागर

Satara News ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ दिंडी, पथनाट्य, कविता व भाषण आणि वेशभूषेतून मराठी भाषा गौरव दिन
रणजित लेंभे/ सातारा
Satara News पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय व छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ तसेच ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक एम. एस. साळुंखे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना पर्यवेक्षक सी. बी. साळुंखे म्हणाले, “मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली अस्मिता आणि संस्कृतीची ओळख आहे. तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.”
मुख्याध्यापक साळुंखे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या समृद्ध आणि वैभवशाली परंपरेचा गौरव करत, डिजिटल युगात वाचनसंस्कृती ही केवळ गरज नसून तो प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले. वाचनालये ही समाजाची बौद्धिक शक्ती वाढवणारी केंद्रे असून कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आदर्श वाचक बनणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा उल्लेख करताना त्यांच्या कवितांतील मानवता, स्वातंत्र्य आणि सामाजिक जाणीव यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. युवकांनी अधिकाधिक मराठी साहित्याचे वाचन करून भाषेचा अभिमान जपावा, असे आवाहनही करण्यात आले.
या निमित्ताने ग्रंथालयाच्या वतीने आकर्षक ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या वतीने गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. संत, साहित्यिक व थोर पुरुषांच्या पोस्टर्ससह विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी वेशभूषेत मराठी भाषेचा जागर केला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले, तर सहावीच्या विद्यार्थ्यांनी “शाळा मराठी आमची” या गीतावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता, मराठी लेख व भाषणे सादर करून कार्यक्रमात उत्साहाची रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक एम. एस. साळुंखे, पर्यवेक्षक सी. बी. साळुंखे, ग्रंथालयाचे अध्यक्ष रणजित लेंभे, ऍड. किशोर खराडे, संतोष कुदळे, काशीद सर, बोबडे सर, जगताप सर, शेटे मॅडम, पाडवी, जाधव, केळंगणे, भोजने, मराठी विभाग प्रमुख जी. बी. पदमने, शेळके सर, ग्रंथपाल आशा पोतेकर तसेच ग्रंथालयाचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





