Bhihar Election
अलीनगरमधून उमेदवारीची चर्चा तेज
Bihar Election पाटणा | 14 ऑक्टोबर 2025:
बिहारच्या लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकूर यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. पाटणा येथील भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षाचा झेंडा हातात घेतला. या सोहळ्यात अनेक समर्थक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून मैथिली ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. त्यांनी नुकतेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या राजकारणात प्रवेशाची चर्चा रंगली होती. आता लोकगायिकेत मने जिंकलेली गायिका राजकीय मने जिंकणार याकडे बिहारचे लक्ष आहे.
अलीनगरमधून उमेदवारीची शक्यता
भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, मैथिली ठाकूर यांना दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून 2020 मध्ये विकासशील इन्सान पक्षाचे मिश्रीलाल यादव विजयी झाले होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
अलीनगर मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर भाजपला येथे एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मैथिली ठाकूर जर या मतदारसंघातून तिकीट घेऊन विजय मिळवतील, तर भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय ठरेल.
मिथिला क्षेत्रात भाजपला बळ मिळणार
मैथिली ठाकूर यांच्या लोकप्रियतेमुळे मिथिला क्षेत्रात भाजपची पकड आणखी मजबूत होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. लोकसंगीत आणि संस्कृतीशी घट्ट नातं असलेल्या मैथिली ठाकूर या बिहारमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचा वापर पक्ष आगामी निवडणुकीत प्रभावी प्रचारासाठी करणार असल्याचे सांगितले जाते.
लोकसंस्कृतीतून राजकारणाकडे प्रवास
लोकसंस्कृतीचा प्रसार करणाऱ्या मैथिली ठाकूर यांना उमेदवारी मिळणं हे बिहारच्या राजकारणात एक नवीन पर्व ठरेल. लोकगायिकेच्या रूपात सुरुवात करून थेट राजकीय रंगमंचावर उतरणाऱ्या मैथिली ठाकूर या बिहारच्या पहिल्या लोककलावंत उमेदवार ठरू शकतात. उत्तर भारतात त्याचा चाहता वर्ग मोठा असल्याने भाजपाला या निवडणुकात याचा फायदा होणार आहे.
मैथिली ठाकूर एक युवा लोककलावंत
मैथिली ठाकूर या बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोकगायिका आहेत. त्या प्रामुख्याने मिथिला संस्कृती, भजनं, आणि भारतीय शास्त्रीय संगीत गातात. त्यांच्या आवाजात पारंपरिक लोकसंगीताचा गोडवा आहे.त्यांचा जन्म २५ जुलै २००० रोजी बिस्फी, दरभंगा (बिहार) येथे झाला. वडील रमेश ठाकूर हे संगीत शिक्षक आहेत, आणि आईचे नाव भुवनेश्वरी ठाकूर आहे. त्यांच्या दोन भावांची नावे ऋषभ ठाकूर आणि अयाची ठाकूर अशी आहेत. हे तिघेही मिळून अनेक वेळा एकत्र गायन करतात.मैथिली ठाकूर यांनी २०१७ मध्ये कलर्स टीव्हीवरील “रायझिंग स्टार” या गायन स्पर्धेत भाग घेतला आणि त्या उपविजेत्या ठरल्या. यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्या संपूर्ण देशभरात ओळखल्या जाऊ लागल्या.त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये शिव तांडव स्तोत्र, भोजपुरी आणि मैथिली लोकगीतं, तसेच भक्तिगीतं यांचा समावेश आहे. त्या नियमितपणे यूट्यूबवर गाणी अपलोड करतात आणि त्यांना लाखो लोक फॉलो करतात.ऑक्टोबर २०२५ मध्ये मैथिली ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. त्यांच्या लोकप्रियतेमुळे मिथिला प्रदेशात भाजपला फायदा होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

