ZP Election
ZP Election भाजपच्या जिल्हा परिषद इच्छुकांच्या शनिवारी मुलाखती
सातारा/प्रतिनिधी
ZP Election सातारा जिल्ह्यात भाजपने नगरपालिका निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी सातारा जिल्हा भाजपने जोरदार तयारी केली असून भाजपा सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखत कार्यक्रम शनिवार, दि. 17 जानेवारी आणि रविवार, दि. 18 जानेवारी रोजी होणार आहे, तालुकानिहाय दोन दिवस या मुलाखती होणार आहेत अशी माहिती भाजप कार्यालयातुन देण्यात आली.
भाजपच्यावतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी स्थापन करण्यात आलेल्या पॅनलमध्ये जिल्हा निवडणूक प्रमुख मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, महायुती समन्वयक सुनील काटकर, मदनदादा भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, समशेरसिंह नाईक निंबाळकर, अनिल सावंत, तेजस सोनावले यांचा समावेश आहे.
शनिवार, दि. 17 रोजी सकाळी 9 वाजता कोरेगाव तालुका, सकाळी 11 वाजता महाबळेश्वर व खंडाळा तालुका, दुपारी 12 वाजता वाई तालुका, दुपारी 1 वाजता फलटण तालुका, दुपारी 3 वाजता मान तालुका आणि दुपारी 4 वाजता खटाव तालुक्याच्या मुलाखती होणार आहेत. रविवार, दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता सातारा तालुका, दुपारी 12 वाजता जावळी तालुका, दुपारी 1 वाजता पाटण तालुका आणि दुपारी 3 वाजता कराड तालुक्याच्या मुलाखती पार पडणार आहेत.
हा मुलाखत कार्यक्रम हॉटेल लेक व्ह्यू, गोडोली, सातारा येथे होणार असून सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या तालुक्याच्या ठरवलेल्या वेळेनुसार उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी येताना उमेदवारी अर्ज विहित नमुन्यात भरून सोबत आणणे आवश्यक आहे.तसेच राखीव जागेसाठी इच्छुक उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक असल्याचेही पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हे पण वाचा Mumbai Election :मुंबई आणि मराठी माणसांसाठी एकत्र या.. ठाकरे बंधू






